
सामना ऑलाईन । मुंबई
शहरातील हायप्रोफाईल नशेबाजांना मँगो गांजा उपलब्ध करून देणारा मुख्य सप्लायर अमली पदार्थविरोधी पथकाच्या हाती लागला आहे. त्यामुळे त्या सप्लायरसाठी काम करणाऱ्या एजंटचे धाबे दणाणले असून थर्टी फस्टच्या तयारीला लागलेल्या नशेबाजांचे वांदे झाले आहेत.
तानाजी काते (39) असे मँगो गांजाच्या मुख्य सप्लायरचे नाव आहे. डोंबिवलीत राहणाऱ्या तानाजीसाठी जवळपास 18 एजंट काम करतात. ते एजंट शहरातील हायप्रोफाईल नशेबाजांना मँगो गांजा देण्याचे काम करतात. काही दिवसांपूर्वी अमली पदार्थविरोधी कक्षाच्या वरळी युनीटने परळमध्ये राज ठाकूर रिक्षा चालकाला एक किलो 800 ग्रॅम वजनच्या मँगो गांजाची डिलेव्हरी देण्यासाठी आला असता पकडले होते. तेव्हा आमचा मुख्य सप्लायर तानाजी असून तो डोंबिवलीत राहतो, असे राजने चौकशीत सांगितले होते. त्यामुळे प्रभारी पोलीस निरीक्षक निनाद सावंत व त्यांच्या पथकाने तानाजीचे घर गाठले होते. मात्र पोलीस कधीही पकडायला येतील याची आधीच कुणकुण लागल्याने तानाजी पसार झाला होता. त्यामुळे चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावून पोलीस माघारी परतले होते. त्यानंतर घाबरलेला तानाजी वरळी युनीटमध्ये हजर झाला. त्याला अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.
आंध्रातून आणतो मँगो गांजा
आंध्र प्रदेशमधून मँगो गांजा आणून तो मुंबई व आजूबाजूच्या शहरांत सप्लाय करतो, असे तानाजीने चौकशीत सांगितल्याचे पोलिसांकडून समजते. त्यामुळे तानाजी नेमका कोणाकडून गांजा घेतो. नक्षलग्रस्त भागातून तो आणतो का, तेथील त्याचे एजंट कोण, याचा पोलीस तपास करीत आहेत.
दम मारता मारता विकू लागला
घरे बांधून ती भाड्याने देण्याचा व्यवसाय करणारा तानाजी आधी स्वतः गांजा ओढायचा. मग त्याला मँगो गांजाची माहिती मिळाली. मँगो गांजाची किंमत आणि वाढती मागणी लक्षात घेऊन मग तानाजीने स्वतः मँगो गांजा विकण्यास सुरुवात केली. त्याने एजंटची चैन तयार केली आहे. पण आता म्होरक्याच गजाआड झाल्याने थर्टी फस्टला मँगो गांजा कसा मिळणार, अशा टेंशनमध्ये नशेबाज आले आहेत.


























































