
>> सामना प्रतिनीधी
लेखक रविराज गंधे यांचे माध्यमरंग हे पुस्तक 25 डिसेंबर रोजी ग्रंथाली प्रकाशनाद्वारे प्रसिद्ध होत आहे. या पुस्तकातील समाज माध्यमांबाबत माहिती सांगणाऱ्या लेखाचा हा संपादित भाग.
जगभरातील संगणक शास्त्रज्ञ हे 1990 सालाच्या आधीपासून Networks of Net Works या संगणकीय प्रणालीवर मोठय़ा प्रमाणावर संशोधन करत होते. सातत्याने सुरू असलेल्या या संशोधनाच्या प्रवाहात संगणक शास्त्रज्ञ टीम बर्नर्स यांनी 1990 साली इंटरनेटचा शोध लावला आणि साऱ्या जगाचं चित्र पालटलं. स्थळ, काळ आणि वेगाच्या सर्व मर्यादा ओलांडून जग आणि जगातील माणसं आणि त्यांचे व्यवहार निमिषार्धात एकमेकांच्या खूप जवळ आले. संदेशवहनाच्या या क्रांतीला छायाचित्रे आणि ध्वनीचित्रमुद्रित फितींची जोड मिळाली. मुंबईतील एखाद्या व्यक्तीने पाठविलेले एखादे छायाचित्र, पत्र, व्हिडीयो क्लिप, मजकूर, न्यूयार्क, केप टाऊन, लंडन, टोकीओ…जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या संगणक अथवा मोबाईल स्क्रीनवर झळकू लागले. जागतिक आर्थिक व्यवहार, व्यवसाय आणि औद्योगिक घडामोडींसाठी अत्यावश्यक असलेल्या संपर्क यंत्रणेचे येणाऱ्या काळातील महत्त्व ओळखून VSNL विदेश संचार निगमने 15 ऑगस्ट 1995 साली इंटरनेट सेवेची हिंदुस्थानात सुरुवात केली. आज हिंदुस्थानातील जवळपास 46 कोटी लोक इंटरनेट सेवेचा वापर आर्थिक, व्यावसायिक, प्रशासकीय, वैद्यकीय, समुपदेशन, शैक्षणिक, बँकाचे व्यवहार आदी अनेकविध कारणांसाठी करीत आहेत. त्यापैकी जवळपास 20 कोटी लोक हे इंटरनेट सेवेच्या फेसबुक, व्हॉट्सऍप, इनस्टाग्राम, वेब सिरीज, स्नॅपचॅट आणि यू-टय़ूब आदि अॅप्सचा मोठय़ा प्रमाणार वापर करीत आहेत. फेसबुक लाइव्ह, व्हिडीओ कॉलिंगच्या वापराचे प्रमाणही लक्षणीय आहे. किरकोळ कामासाठी व घरगुती गरजेच्या गोष्टीसाठी मोठय़ा प्रमाणावर अॅपचा वापर होताना दिसतो. आज विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देणारे व माहिती देणारे सहा कोटी अॅप्स् इंटरनेटवर उपलब्ध आहेत. जगामध्ये फेसबुक-व्हॉट्सअॅप आदी अनेकविध अॅपचा सर्रास वापर करण्यात हिंदुस्थानी लोक आघाडीवर आहेत.
समाज माध्यमाच्या लोकप्रियतेचं सर्वात महत्त्वाचे कारण आणि रहस्य म्हणजे एखादी बातमी, माहिती अथवा मत, विचार हे विनासायास सहज व्यक्त करण्याचं आणि दुसऱ्या व्यक्तीपर्यंत क्षणार्धात पोहचवण्याचं जलद आणि प्रभावी माध्यम म्हणून समाज माध्यमाला अल्पावधीतच मोठा उपभोक्ता वर्ग लाभला. पूर्वी समाजापुढे जी माहिती, बातमी यायची, ती वर्तमानपत्रं, रेडिओ, टीव्हीद्वारा ती एखाद्या व्यक्ती वा विचारधारेला अनुसरून, संपादकीय चाळणीतून लोकांपुढे यायची आणि ती खरी आहे हे मानण्यावाचून पर्याय नसायचा. त्या संदर्भात आपलं मत-विचार, भावना मांडण्याची सुविधा-हक्क लोकांना होता आणि आजही आहे; परंतु ते विचार-मत संपादकांना छापण्यायोग्य अथवा प्रसारित करण्यासारखे वाटले तरच ते लोकांपर्यंत पोहचायचे. ही संधी अर्थातच मूठभर लोकांना मिळायची. समाज माध्यमांनी हा अडसर दूर केला आणि सर्वसामान्यांना राजकीय, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक विषयक घडामोडी बातम्याविषयी आपली मत, विचार जगासमोर मांडण्याची संधी दिली आणि हेच समाज माध्यमांचे मोठे बलस्थान आहे. सर्वसाधारणपणे प्रसारमाध्यमांमधून सुप्रसिद्ध आणि संबंधित विषयातील तज्ञ मंडळींना संधी मिळायची. समाज माध्यमांमध्ये मात्र अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य सर्वसामान्यांना मिळालं. समाजातल्या अतिसामान्य गरीब शेतकरी, गृहिणी, मजूर, फेरीवाला आदी सर्वांनाच व्यक्त होण्यासाठी समान व्यासपीठ मिळाले. माध्यमाच्या या ताकदीचा उपयोग सर्वसामान्य माणसं एखाद्या सामाजिक, राजकीय, धार्मिक विषयासंदर्भात प्रश्न आणि समस्यांच्या अनुषंगानं जनमत तयार करण्यासाठी वापर किंवा दुरुपयोग करू लागले आहेत. समाज माध्यमांची ही सकारात्मक आणि विधायक बाजू आहे. यामुळे खऱ्या अर्थानं लोकशाहीचे जतन होते.
तंत्रज्ञानानं आजच्या संगणक युगात मानवता बहाल केलेल्या या सोनेरी क्षितिजाला एक काळी किनार आहे. या माध्यमांवर व्यक्त होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर अभिव्यक्तीचं बंधन नसल्याने देशाची कायदा सुव्यवस्था आणि शांतता धोक्यात आणणारी काही कृत्ये समाज माध्यमांचा चुकीचा वापर करून समाजातील काही समूह आणि व्यक्ती करताना दिसतात. एखादा राजकीय नेता, समाजसेवक, साहित्यिक कलावंत पुराणातील दाखले देऊन समाजात तेढ निर्माण करून जातो. हिंदुस्थानातच नव्हे, तर जगात हेच चित्र कमी अधिक प्रमाणावर दिसते.
‘मी टू’ चळवळीच्या संदर्भात असंख्य स्त्रियांनी आपल्यावर झालेले अन्याय, अनुभव आणि विचार समाज माध्यमावर मोठय़ा प्रमाणात शेअर केले. पुरुष मंडळींनी त्याची टिंगलटवाळी करून विनोदी शेरेबाजी करत चळवळीचे गांभीर्य घालवलं. स्त्री-पुरुष समानतेच्या युगात समाज माध्यमांनी जबाबदारीने अभिव्यक्त होणे अपेक्षित आहे. अर्थात सर्वच माध्यमकर्मी असा चुकीचा वापर करीत नाहीत. फेसबुक, व्हाटस्अॅपवर साहित्यिक कलाविषयक, सामाजिक विषयांवरील, दर्जेदार-माहिती पूर्ण लेखांचं आदानप्रदान करणारे अनेक चांगले ग्रुप्स मोठय़ा प्रमाणावर कार्यरत आहेत. वैद्यकीय मदत, रक्त व अवयवदान, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत आदी विविध कारणांसाठी समाज माध्यमांवर केल्या जाणाऱ्या आव्हानांना चांगला प्रतिसाद मिळतो. समाज माध्यमांचा दुसरा एक सामाजिक दुष्परिणाम असा की प्रौढांसाठी असलेल्या विविध पॉर्न साइटस् किंवा सिक्रेट गेमसारख्या लैंगिकता चाळवणाऱ्या विविध मालिका या सहजी एका क्लिकवर उपलब्ध झाल्याने मोठय़ा प्रमाणावर किशोरवयीन आणि लहान मुले पाहतात. रहस्य आणि हिंसा यांनी ओतप्रोत भरलेल्या वेबसाइट आणि मालिका पाहून मुले हिंसात्मक कृत्ये करायला धजावतात. सेल्फीचं वेड तरुणवर्गात आणि लहान मुलांमध्ये झपाटय़ाने पसरत आहे.
या सर्वांवर नियंत्रण असणे गरजेचे आहे. आजच्या घडीला ट्रेडिंग बातम्या अथवा घृणास्पद अपमानजनक मजकूर आणि छायाचित्रांवर नजर ठेवणारी कायदेशीर यंत्रणा नाही. सोशल मीडिया कम्युनिकेशन हबची स्थापना सरकारच्या सूचना न्यायालयाने व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिक्षेप होतो म्हणून फेटाळून लावली आहे. व्यक्तिस्वातंत्र्याची बूज राखली जावी असे न्यायालयाचे म्हणणे असले तरी वाढती लैंगिकता, हिंसाचार, धार्मिक विद्वेष असलेला आशय प्रमाणित केला जावा अशी सूचना माहिती व प्रसारण खाते आणि इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशनला न्यायालयाने केली आहे.
समाजमाध्यमाचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी झुकरबर्ग यांनी ब्रुसेल्स येथील युरोपिअन युनियनच्या मुख्यालयात केलेल्या भाषणात फेसबुकच्या चुकीच्या वापरासंदर्भात पश्चात्ताप होत असल्याची कबुली काही दिवसांपूर्वी दिली. फेसबुकचा वापर दुसऱ्याची निंदानालस्ती करण्यासाठी, खोटय़ा बातम्या पेरण्यासाठी केला जाईल असा विचारही आमच्या मनात आला नाही, तसंच फेसबुकवरील माहितीचा वापर करून चोरटय़ारीतीने विविध देशांमधील निवडणुकांमधील सहभागी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा काही जण प्रयत्न करतील असंही कधी वाटलं नसल्याचं त्यांनी म्हटलं. या गोष्टी रोखण्यासाठी आम्ही उपाययोजना केल्या नाहीत ही आमची मोठीच घोडचूक आहे अस स्पष्ट उद्गार त्यांनी काढले. या चुकीचं परिमार्जन करण्यासाठी फेसबुक आणि ट्विटरने फेक अकाऊंट बंद करण्याची मोहीम उघडली आहे.




























































