पालकमंत्र्यांना भारिपने दाखवले काळे झेंडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। हिंगोली

भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत, अशी बेताल बडबड करणे भाजपाचे नेते तथा हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांना महागात पडली आहे. प्रचंड पोलीस फौजफाटा व भाजप कार्यकर्त्यांचा गराडा असतांनाही भारीप बहुजन महासंघाच्या हिंगोली येथील कार्यकर्त्यांनी पालकमंत्री दिलीप कांबळे यांना काळे झेंडे दाखवून निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या .दरम्यान, दोन तास रंगलेल्या या नाट्यानंतर पालकमंत्र्यांनी सुतकी चेहरा करत हिंगोलीतून पोलिसांच्या मदतीने काढता पाय घेतला . पोलिसांनी भारीप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

हिंगोलीचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे हे आज सोमवारी हिंगोली जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. विश्रामगृहात बसून टंचाई आढाव्याचा प्रशासकीय सोपस्कार पार पडल्यावर भाजपा पदाधिकार्‍यांसोबत मुख्यमंत्री चषक स्पर्धेबाबत विस्तृत चर्चा कांबळे यांनी केली. यादरम्यानच भारीप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते विश्रामगृहाच्या बाहेर जमायला सुरूवात झाली. प्रकाश आंबेडकरांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे विधान राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केले असून, त्यांनी माफी मागावी अशी मागणी भारीप कार्यकर्त्यांनी केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पत्रकार परिषद आटोपून दीड तासापेक्षा जास्त काळ पालकमंत्र्यांनी विश्रामगृहाच्या कक्षातच थांबणे पसंत केले. यादरम्यान, पोलिस उपाधीक्षक राहुल मदने, शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांनी भारीप कार्यकर्त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. तसेच तुम्हाला ताब्यात घ्यावे लागेल असे सांगितले. त्यावर आमचा गुन्हा काय, आम्ही लोकशाही मार्गाने निषेध नोंदविणार आहोत असा बिनतोड जवाब कार्यकर्त्यांनी दिला. भारीपचे कार्यकर्ते विश्रामगृह परिसरातून जाणार नाहीत तोपर्यंत मी ही इथून हलणार नाही अशी ताठर भूमिका पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी घेतली. यादरम्यान भाजपाचे आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार गजाननराव घुगे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनीही मध्यस्थीचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीचे आमदार रामराव वडकुते हे भारीपच्या कार्यकर्त्यांसोबत जाऊन मिळाल्यावर घोषणाबाजीला आणखीणच धार चढली. तब्बल दोन तास सुरू असलेल्या या प्रकाराने वातावरण तणावपूर्ण होते.

पालकमंत्री दिलीप कांबळे हे कक्षातून वाहनात बसण्यासाठी विश्रामगृहाच्या पोर्चमध्ये येताच भारीप कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखविले. तसेच दिलीप कांबळेचे करायचे काय खाली मुंडके वर पाय, मनुवादी पालकमंत्र्याचा निषेध असो अशा जोरदार घोषणा दिल्या. ही घोषणाबाजी सुरू असतांनाच वाहनात बसुन कांबळे हे पोलिसांच्या गराड्यात पुण्याच्या दिशेने मार्गस्त झाले. तर भारीपचे वसीम देशमुख, रविंद्र वाढे, ज्योतीपाल रणविर, किरण घोंगडे, सोमनाथ शेळके, छाया नांदेडकर, वर्षा मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.