
>> दिलीप जोशी
‘घडले काही बुरेभले… एक आणखी वर्ष संपले!’ खूप वर्षांपूर्वी कुठे तरी, केव्हा तरी ऐकलेल्या काव्यातली ही एक ओळ. काळ सरत चालला (आणि वय वाढत चाललं) की पूर्वी घडलेल्या, ऐकलेल्या गोष्टी खोल अंधार्या गुहेत दडल्यासारख्या वाटू लागतात, पण मनाची शक्ती अगाध असते. ही मनसंपदा कधी कोणत्या गतक्षणाची स्मृती समोर उभी करील ते सांगता येत नाही. सहा दिवसांनी पाश्चात्य कालगणनेचे आणखी एक वर्ष संपेल. तसं पाहिलं तर यात निसर्गाच्या दृष्टीने वेगळं काहीच घडत नाही. काळ सतत बदलत असतो. त्याचे भाग आपल्या सोयी-समजुतीने आपणच पाडतो. त्यातून ‘घटिका गेली, पळे गेली, तास वाजे ठणाणा’ असं करीत एकेक दिवस आणि संवत्सर सरतं.
2018 नामे एक व्यावहारिक संवत्सर असंच आता कालवश होण्याच्या उंबरठ्यावर आहे. या वर्षी जगातल्या सात अब्ज माणसांच्या जीवनात काही ना काही भलंबुरं घडलंच असेल. अगदी विशेष असं काही घडलेलीही अनेक मंडळी असतील. काहींचा जन्मच या वर्षात झाला असेल. त्याला कळायला लागल्यावर आयुष्यभर या वर्षाचं महत्त्व जाणवत राहील. या वर्षी अठरावं वर्ष पूर्ण करणार्या नवतरुणाईला आयुष्य नवनवोन्मेषाने भारलेलं वाटेल. चाळिशी उलटत चाललेले गतकाळाचं सिंहावलोकन करीत पुढची मनोराज्ये रचत असतील. साठी मागे पडलेल्यांना वृद्धत्वाची थोडीशी चाहुल लागली असेल. अमृत महोत्सवी झालेल्यांना ‘आपला’ काळ आणि ‘आताचा’ काळ यात प्रचंड तफावत दिसू लागली असेल. वयाची शतकपूर्ती केलेले तुलनेने कमीच असतील. त्यांना गेल्या 100 वर्षांतलं काय काय आठवत असेल.
परवाच एका एकशे दोन वर्षांच्या आजीबाईंची गोष्ट वाचली. म्हणजे पाहिली. ती अत्यंत विस्मयकारी होती. शतकोत्तर दुसर्या वर्षी आजीबाईंनी अवकाशातून डायव्हिंग करण्याचा ध्यास घेतला आणि प्रशिक्षकाच्या सहाय्याने त्या दोन्ही हात पसरून पक्ष्यासारख्या उंच आकाशात तरंगायला लागल्या. ज्या वयापर्यंत पोहोचलं तर बहुधा अनेक आधीव्याधींनी जराजर्जर झालेल्या कुडीतला आत्मा सांभाळत जेमतेम हालचाल करता आली तरी कौतुकाचं ठरावं अशा वयात इरेन ओरॅफ नावाच्या आजीबाईंना थेट आकाशझेप घेण्याची ही विलक्षण ऊर्मी कुठून आली? त्याचं उत्तरही स्फूर्तिदायक आहे. स्टीफन हॉकिंग यांना झालेल्या मोटार न्यूरॉन विकाराच्या सामान्य रुग्णांना आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी हे साहस केलं. सरणारं वर्ष त्यांनी 14000 फुटांवरून डायव्हिंग करून त्यांच्यापुरतं संस्मरणीय तर केलंच, पण जगातल्या प्रत्येक व्यक्तीला उत्साहाचा, उमेदीचा आणि सामाजिक भान बाळगण्याचा सक्रिय संदेश दिला. असं करायला लागणारं धाडस या वयात त्यांना कुठून आलं? भीती नाही वाटली? नसेलच. त्याशिवाय का त्या जगातल्या डायव्हिंग करणार्या सर्वात वृद्ध महिला ठरल्या? त्यांच्या या जिद्दीला सलाम करायला हवा. जीवनातले बरेवाईट अनुभव या आजीबाईंनासुद्धा आलेच असतील. मग तरीसुद्धा एवढी जीवनेच्छा सरत्या काळाला आव्हान देत त्यांच्या मनात कशी जागृत राहिली? प्रत्येकाच्या मानसिक जडणघडणीवर हे अवलंबून आहे. पंचवीसेक वर्षांपूर्वी अतिवृद्धांच्या मुलाखती घेणार्या एका अमेरिकन तरुणाने एका शतायुषी बाईंना विचारलं, ‘मरणाची भीती नाही वाटत?’ त्या हसून उत्तरल्या, ‘नाही. कारण रोज रात्री झोपण्यापूर्वी मी प्रभूकडे आणखी एक दिवस मागते आणि तो माझी इच्छा पूर्ण करतो.
ही तर साधंसुदं जीवन जगणार्या व्यक्तीची गोष्ट. मग ज्यांच्या जीवनात उत्तुंग ध्येय असेल त्यांना तर प्रत्येक वर्ष नवी ऊर्जा देत असेल. स्पर्धेच्या जगातलं जिंकणं-हरणं हा आयुष्याच्या खेळाचाच एक भाग. तरीसुद्धा त्यात यश मिळालं की आपल्याबरोबरच आपल्या लाखो चाहत्यांच्या मनात आनंदाची लहर निर्माण करण्याची ताकद उत्तर कलाकार, लेखक, क्रीडापटू या सर्वांमध्ये असते. 2018 हे वर्ष संपत असताना तीन क्रीडा प्रकारांत देशाच्या तीन क्रीडा रागिणींनी देशाची मान उंचावली आहे.
बॉक्सिंगसारख्या एकेकाळी केवळ पुरुषांची मक्तेदारी असलेल्या खेळात जगज्जेतेपद मिळविणार्या मेरी कोम यांनी एक इतिहास निर्माण केला आहे. सायना नेहवालने बॅडमिंटनमध्ये आपलं जागतिक कर्तृत्व सिद्ध केलंय आणि पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटनच्या क्षेत्रातच जगातल्या अनेक देशांच्या स्पर्धकांना नमवत जगभरातील आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं. अशा बातम्या कोणाचाही उल्हास वाढविणार्या असतात. एरव्ही विद्ध करणारी अनेक वृत्तं सतत कानामनावर आदळतच असतात. प्रत्येक वर्षात भलंबुरं घडतच असतं. तो निसर्गनियमच आहे, परंतु बुद्धिशाली म्हणवणार्या आणि सभोवताल बदलण्याची क्षमता असणार्या माणूस नामक प्राण्याने आपल्यापुरती तरी जिद्द आणि उमेदीची ऊर्जा निर्माण करायचं ठरवलं तर प्रत्येक वर्षाचा ताळेबंद तुटीचा न होता शिलकीचा होईल.
काय दिलं-घेतलं गत वर्षाने? याचा व्यक्तिगत पातळीवरचा हिशेब अलिप्तपणे मनाशीच मांडला तर अनेक गोष्टी पुन्हा कराव्याशा वाटतील. बर्याच गोष्टी टाळाव्याशा वाटतील. यशाचे क्षण आठवताना मन उचंबळून येईल. चुका, गफलतींचाही गंभीरपणे विचार केला तर पुढील काळात त्या टाळता येतील. प्रत्येक वर्ष काही ना काही शिकवून जातच असतं. आपण किती नि काय शिकावं हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असतं. एक वर्ष सरलं तरी नवं येणारच. त्यासाठी सदिच्छा!































































