
सामना ऑनलाईन,रत्नागिरी
रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाच्या खराब ध्वनीयंत्रणेमुळे ‘आमच्या हिचं प्रकरण’ नाटकाचे कलाकार भयंकर वैतागले आहेत. या कलाकारांना सोमवारी नाटक अर्ध्यावर थांबवत ध्वनीयंत्रणा व्यवस्थित चालतेय की नाही हे स्वत:च तपासून पहावं लागलं. याप्रकारानंतर नाट्यगृहाच्या व्यवस्थापनावर कलाकार आणि प्रेक्षक यांनी संताप व्यक्त केला आहे. २४ डिसेंबरच्या संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास मोठ्याने बोलूनही आवाज जात नाही हे कलाकारांच्या लक्षात आलं. मोठ्याने बोलून कलाकारांनाही त्रास व्हायला लागला होता. अभिनेता निखील रत्नपारखी आणि अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी नाट्यप्रयोग अर्ध्यावर थांबवला. भार्गवी चिरमुले हिने स्वत: माईक तपासायला सुरुवात केली. तपासणी करत असतेवेळी माईक चालत नसल्याचं सगळ्या कलाकारांच्या आणि प्रेक्षकांच्या लक्षात आलं. प्रेक्षकांचा हिरमोड होऊ नये म्हणून कलाकारांनी त्यांना ध्वनीयंत्रणेशिवाय नाट्यप्रयोग सुरू ठेवला तर चालेल का असा प्रश्न विचारला. त्यांचं होकारार्थी उत्तर आल्यानंतर कलाकारांनी नाटक पुढे सुरू केलं.

























































