
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
प्रकाश आंबेडकरांना डावे पक्ष, संघटना चालतात, एमआयएम चालतो मग रिपब्लिकन पक्ष का चालत नाही? असा सवाल पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे आमदार जोगेंद्र कवाडे यांनी उपस्थित केला असून प्रकाश आंबेडकरांनीच रिपब्लिकन पक्षांना आघाडीपासून ‘वचिंत’ ठेवले आहे, असा आरोपही त्यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
आगामी लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम या पक्षाला सोबत घेऊन वचिंत आघाडी स्थापन केली. ही आघाडी स्थापन करताना त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या एकाही नेत्याला विचारणा केली नाही, त्यांना डावे पक्ष, संघटना चालतात मग रिपब्लिकन पक्षाच वावडे का? त्यांनी पुढाकार घेतला असता तर रिपब्लिकन पक्षांनी त्याला विरोध केला नसता असे मत आमदार कवाडे यांनी व्यक्त केले.
आगामी निवडणुकीत काँग्रेसने अॅड. प्रकाश आंबेडकरांना आकोला मतदार संघात पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे. अॅड. आंबेडकरांना आकोल्यासाठी पाठिंबा दिला पण प्रकाश आंबेडकरांनी 11 जागांची मागणी केली होती, आंबेडकरांनी त्यांच्या व्यतिरिक्त हे ११ उमेदवार उभे केले तर काँग्रेस त्यांना पाठिंबा देणार आहे का, हा एक प्रश्नच आहे. तसेच आगामी निवडणुकीमध्ये पिपल्स रिपब्लिकन पार्टीने काँग्रेस पक्षाकडे सहा जागांची मागणी केली असून विदर्भात चार तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी प्रत्येकी एक जागावर निवडणूक लाढविणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रकाश आंबडेकर यांनी मुस्लीमांना सोबत घेऊन आघाडी स्थापण केली तसा प्रयोग यापूर्वीही करण्यात आला होता त्यावेळी त्यांनी आमच्याशी बरीच चर्चाही केली होती. आता मात्र प्रकाश आंबेडकरांनी असे का केले असा सवालही प्रा. कवाडे यांनी उपस्थित केला.
प्रशासनाने असे का केले?
भिमा कोरेगाव येथे विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी भिमसैनिक जाणार आहेत. मात्र प्रशासनाने यंदा कडक बंदोबस्त तैनात केला असून सर्व सुविधाही पुरविल्या जाणार आहेत, प्रशासन असे का करत आहे असा सवाल प्रा. कवाडे यांनी उपस्थित केला. या पत्रकार परिषदेस गोपाळराव आरोही, गणेश पडघन, चरणदास हिंगोले, जे. के. नारायणे, रवि नाथभाजन, अॅड, सोनाली आहिरे, विजया दाभाडे, लक्ष्मण कांबळे, अनिल तुरकमाने यांची उपस्थिती होती.


























































