
सामना प्रतिनिधी । कराड
राफेल विमान खरेदीप्रकरणी केंद्र सरकारने तीन गुन्हे केले आहेत. खोटे बोलणे, न्यायालयात खोटी माहिती देऊन दिशाभूल करणे आणि संसदेचा हक्कभंग करणे असे ते गुन्हे आहेत. काँग्रेस आपल्या भूमिकेपासून मागे हटणार नसून याप्रकरणी संयुक्त संसदीय समितीकडून सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. या मागणीसाठी काँग्रेस संसदेत आणि संसदेबाहेर सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे ज्येष्ठ काँग्रेस नेते रत्नाकर महाजन यांनी सांगितले. याप्रकरणी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे संकेतही त्यांनी दिले.
कराडमधील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलतना रत्नाकर महाजन यांनी काँग्रेसच्या भूमिकेचा पुनरूच्चार करत केंद्र सरकारच्या धोरणांविरूद्ध जोरदार टीका केली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, शहराध्यक्ष नगरसेवक राजेंद्र माने, झाकीर पठाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
महाजन म्हणाले, काँग्रेसच्या काळातील राफेल ५२६ कोटीवरून १६०० कोटींच्या घरात कसे गेले ? ३६ तयार विमाने खरेदी करण्याचे ठरले असताना १८ विमानेच का खरेदी करण्यात आली ? संरक्षण साहित्य उत्पादनाचा अनुभव नसणार्या कंपनीला काम देताना ३० ते ३५ वर्ष कामाचा अनुभव असणार्या कंपनीला का नाकारले ? असे प्रश्न उपस्थित करत या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळालीच पाहिजेत, अशी मागणीही महाजन यांनी यावेळी केली.



























































