‘द अॅक्सिडेन्टल प्राइम मिनिस्टर’चा ट्रेलर लाँच, काँग्रेस न्यायालयात जाणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

अभिनेते अनुपम खेर यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भूमिका केलेल्या ‘द अॅक्सिडेन्टल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर आज लाँच झाला. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रदर्शित होणाऱया या चित्रपटात काँग्रेस आणि गांधी घराण्यावर टीका करण्यात आल्यामुळे त्याला काँग्रेसने विरोध केला आहे. हा चित्रपट कोर्टाच्या कचाटय़ात अडकण्याची चिन्हे आहेत.

‘द अॅक्सिडेन्टल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे यांनी दिला आहे. या चित्रपटाचा 2 मिनिटे 43 सेकंदांचा ट्रेलर आज लाँच झाल्यानंतर काँग्रेसने त्या चित्रपटाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. हा चित्रपट येत्या 11 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अनुपम खेर हे डॉ. मनमोहन सिंग यांच्या भूमिकेत असून त्यांचे मीडिया सल्लागार म्हणून काम केलेल्या संजय बारू यांच्या भूमिकेत अक्षय खन्ना आहे. बारू यांच्या ग्रंथावरच हा चित्रपट आधारित आहे. शिवाय काँग्रेस पक्षांतर्गत राजकारण दाखवताना यूपीए सरकार कोणाच्या इशाऱयावर चालत होते. तसेच राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी कशाप्रकारे तयारी चालली होती हे अक्षय खन्ना सांगताना ट्रेलरमध्ये दिसतो. या चित्रपटात राहुल गांधी आणि प्रियंका वढेरा यांच्या पक्षातील भूमिकेवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रदर्शित होणाऱ्या ‘द अॅक्सिडेन्टल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाचा काँग्रेसवर टीका करण्यासाठी वापर होऊ शकतो, अशी भीती काँग्रेसच्या गोटात व्यक्त केली जाते.

वाद कशावरून पेटला?
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक डायलॉग दाखविण्यात आला आहे. ‘मला तर डॉ. साहेब (मनमोहन सिंग) हे भीष्मासारखे वाटतात. त्याच्यात चुकीचे असे काही नाही, पण ते फॅमिली ड्रामाचे शिकार झाले आहेत. महाभारतात दोन कुटुंबे होती, पण हिंदुस्थानात एकच घराणे आहे, असा डायलॉग संजय बारू यांची भूमिका केलेल्या अक्षय खन्ना याच्या तोंडी चित्रपटात टाकण्यात आला आहे.