
सामना प्रतिनिधी । पेण
वर्ष अखेर म्हणजे 31 डिसेंबर साजरा करण्याकरिता हजारो पर्यटक खाजगी गाडीने तसेच बसेस, एसटीने व मोटारसायकलने कोकणाकडे व गोव्याला जात असल्याने मुंबई – गोवा महामार्गावर वाहतुकीचा ताण वाढला आहे. शनिवारी दिवसभर वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागला. पेण ते वडखळ हे 7 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी दोन ते अडीच तासांचा वेळ लागत असल्याने हौशी पर्यटकांच्या हौशेवर पाणी फिरले होते. त्यातच चौपदरीकरणाचे काम चालु असल्याने वाहतूक नियंत्रित करण्यात वाहतुक पोलिसांनाही शर्थीचे प्रयत्न करायला लागत होते. जेष्ठ नागरिक व लहान मुले अक्षरशः वैतागून गेले होते.
शनिवारी मुंबई, ठाणे, कल्याण आदि ठिकाणचे प्रवासी कोकणात जाण्यासाठी निघाले असल्याने तसेच अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, गणपतीपुळे, रत्नागिरी, हर्णे बंदर, गोवा आदि समुद्र किनारी पर्यटनासाठी जाणारे पर्यटकांमुळे मुंबई – गोवा महामार्ग पेण नजीक ठिक ठिकाणी 2 ते 5 किलोमीटर पर्यंत ‘जॅम’ झाला होता.
मुंबई – गोवा महामार्गाचे चौपदरीकरणांचे सुरु असलेल्या कामा मुळे या महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहेत. त्यातच बेशिस्त वाहनचालक यांच्यामुळे पेण नजीक खारपाडा, जीते, तरणखोप, रामवाडी, वडखळ आदी ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या महामार्गावर काही ठिकाणी दुभाजक नसल्याने बेशिस्त वाहनचालक उलट्या दिशेने वाहने चालवत असल्याने मुंबईकडे जाणारी व कोकणात जाणारी अशी दोन्ही बाजूकडील वाहने अडकून पडली होती.
ठिकठिकाणी वाहतूक पोलीस वाहतूक कोंडी सोडवीत होते. पेण – वडखळ मार्गावर जिते, हमरापुर, अंतोरा, रामवाडी, उचेडे, वडखळ मध्ये वाहतुक पोलीस मोठ्या सख्येंने वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत होते. जिल्हा प्रशासनाने अवजड वाहतुक बंद करूनही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.





























































