कुडाळमध्ये शिवसेनेच्या वतीन सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांच्या संकल्पनेतून व सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने शिवसेना क्लासिक सामुदायिक विवाह सोहळा रविवारी कुडाळ येथील नवीन एसटी स्थानकाजवळील मैदानावर होत आहे. या सोहळ्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. रविवारी दुपारी 12.41 वाजण्याच्या शुभ मुहूर्तावर 32 वधू-वरांचा सामुदायिक विवाह सोहळा पुरोहीत व जिल्हावासियांच्या साक्षीने धुमधडाक्यात पार पाडला जाणार आहे अशी माहिती शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी शनिवारी कुडाळ येथे पत्रकार परिषदेत दिली.

या विवाह सोहळ्याच्या ठिकाणी शनिवारी आमदार वैभव नाईक यांनी नियोजनाचा आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आ.वैभव नाईक बोलत होते. जि.प.गटनेते नागेंद्र परब, नगरसेवक सुशांत नाईक, सचिन काळप, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

आ.नाईक म्हणाले की, शिवसेना खासदार विनायक राऊत व क्लासिक स्टील्स(मुंबई)चे क्रांतीलाल मारू यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्यदिव्य असा प्रथमच सामुदायिक विवाह सोहळा पार पडत आहे. यावेळी सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते तथा उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई, पालकमंत्री दीपक केसरकर, खा.विनायक राऊत, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, आ.सदानंद चव्हाण, जिल्हा संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रतिष्ठित व्यक्ती, पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. तसेच क्लासिक स्टील समुहाचे 72 लोक या सोहळ्याला उपस्थित राहून वधू-वरांना आशिर्वाद देणार आहेत.

हा सोहळा यशस्वीपणे पार पडण्यासाठी विविध समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. शिवसेना, युवासेना व महिला आघाडी पदाधिकारी यांनी यशस्वीपणे नियोजन केले आहे. भव्य विवाह मंडप उभारण्यात आला आहे. आतमध्ये मुख्य व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. प्रत्येक जोडप्याच्या वर्‍हाडी मंडळींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे 8 हजार लोकांच्या उपस्थितीचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक जोडप्या सोबत एक पुरोहित असणार आहेत. वधु-वरांसह व-हाडी मंडळींना येण्या- जाण्यासह सोहळ्यास उपस्थित राहणार्‍या सर्वांच्या स्नेहभोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. वधू-वरांना संसारपयोगी साहित्यही भेट स्वरूपात दिले जाणार आहे. तसेच सायंकाळी विवाह सोहळा ठिकाणापासून शिवसेना शाखा, कुडाळ अशी बॅण्ड पथकाच्या वाद्यात वाजत गाजत धुमधडाक्यात वरातही काढली जाणार आहे. या सोहळ्यास सिंधुदुर्ग जिल्हावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वधू-वरांना आशिर्वाद द्यावेत असे आवाहन खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच असा भव्यदिव्य सामुदायिक विवाह सोहळा शिवसेनेच्या माध्यमातून होत आहे. या पार्श्वभूमीवर विवाह सोहळच्या मंडप व परिसरात तसेच कुडाळ शहरात भगवे झेंडे लावण्यात आले असून संपूर्ण परिसर भगवामय झाला आहे. खा.विनायक राऊत व आ.वैभव नाईक यांनी स्वतः जातीनिशी लक्ष देऊन सोहळ्याचे यशस्वी नियोजन केले आहे. संपूर्ण सोहळ्याचे काटेकोरपणे नियोजन करण्यात आले आहे.