
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईमध्ये सिम स्वॅपिंगचा एक असा प्रकार उघडकीस आला आहे जो ऐकून तुमच्या पायाखालची जमिन सरकेल. माहिममध्ये राहणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या मोबाईलवर रात्रीच्या सुमारासह दोन वेगवेगळ्या नंबरने सहा मिस कॉल्स आले आणि काहीच वेळात त्यांच्या खात्यातून 2 कोटी रुपये गायब झाले. आपल्या खात्यातून अचानक पैसे काढल्याचे लक्षात आल्यावर त्यांची पाचावर धारण बसली. अधिक चौकशी केली असता वेगवेगळ्या चौदा खात्यांमध्ये ही रक्कम ट्रान्सफर झाल्याची माहिती मिळाली. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.
माहिम येथे राहणारे व्यापारी व्ही शाह यांना 27 आणि 28 डिसेंबरच्या रात्री दोन वेगवेगळ्या नंबरने सहा मिस कॉल आले. यानंतर काही वेळाने त्यांच्या अकाऊंटवरून 1.86 कोटी रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केल्याचे समोर आले. तपासाअंती त्यांना आलेल्या मिस कॉलपैकी एक नंबर ब्रिटनचा (+44) असल्याचे उघड झाले. त्या नंबरवर पुन्हा कॉल करण्यात आला तेव्हा नंबर बंद झाल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, शाह यांच्या तक्रारीनंतर बँकेने तातडीने कारवाई करत 20 लाखांची रक्कम परत मिळवण्यात यश मिळवले. परंतु बाकीची रक्कम चोरट्यांनी खात्यातून काढून घेतल्याने मिळू शकली नाही. शाह यांच्या तक्रारीनंतर बीकेसी येथील सायबर क्राईम पोलिसांनी कलम 420, 419, 34 आणि आयटी अॅक्ट कलम 43 आणि 66 डी अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
मोबाईल नंबर होतो ब्लॉक
सायबर एक्सपर्टच्या मते, सिम स्वॅपिंगच्या दरम्यान ग्राहकाचा मोबाईल नंबर ब्लॉक होतो. यूझरचा मोबाईल नंबर ब्लॉक झाल्यानंतर त्याच्या फेक आयडी प्रूफच्या मतदीने त्याच नंबरचे डुप्लिकेट सिम कार्ड काढले जाते आणि मोबाईल नंबर व ओटीपी मिळवून ऑनलाईन बँकिंगचा पासवर्ड बदलला जातो. याचा वापर करून ग्राहकाच्या खात्यातून पैसे काढले जातात किंवा ऑनलाईन शॉपिंग केली जाते.

























































