
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाची आयपीएल स्पर्धा देशाबाहेर होईल असे वाटत असतानाच सर्वोच्च न्यायालयाकडून नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकीय समितीने मंगळवारी आयपीएलचा खेळ हिंदुस्थानातच रंगणार असे सांगत सर्व शंकाकुशंकाना पूर्णविराम दिला. तसेच आयपीएलच्या यंदाच्या मोसमाचा थरार 23 मार्चपासून तमाम क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळणार आहे. थोडय़ाच दिवसांत स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
हिंदुस्थानातील निवडणुकीमुळे दोन वेळा आयपीएलमधील लढती देशाबाहेर खेळवण्यात आल्या होत्या. 2009 साली दक्षिण आफ्रिकेत तर 2014 साली यूएईत या स्पर्धेच्या लढती पार पडल्या. यंदाही आयपीएल इतरत्र होईल अशी चिन्हं निर्माण झाली होती, पण प्रशासकीय समितीने नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हिंदुस्थानातच ही स्पर्धा खेळण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.
प्रशासकीय समिती या स्पर्धेतील समभागधारकांशी या विषयावर चर्चा करणार आहे. त्यानंतरच स्पर्धेचे वेळापत्रक व इतर बाबींची घोषणा करण्यात येईल. यावेळी प्रशासकीय समितीचे विनोद राय म्हणाले, निवडणुकीची तारीख निश्चित झाल्यानंतर केंद्र तसेच राज्य सरकार यांच्याशी संवाद साधणार आहोत. तसेच पर्यायी स्टेडियमही सज्ज ठेवणार आहोत.

























































