बेस्ट संप चिघळला! कामगारांना मेस्मा… संघर्ष पेटला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, या मुख्य मागणीबरोबर अन्य मागण्यांसाठी  मंगळवारी सुरू झालेला बेस्टचा संप बेस्टच्या कृती समितीचे सदस्य चर्चेला उपस्थित न राहिल्यामुळे आज आणखी चिघळला. त्यामुळे संप दडपण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलत 300 कर्मचाऱ्यांना मेस्मा कायद्यांतर्गत नोटीस बजावली तर 200 कर्मचाऱ्यांना बेस्ट वसाहतींमधील निवासस्थाने रिकामी करण्याची नोटीस बजावली. प्रशासनाच्या या कारवाईमुळे संतप्त झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी वडाळा, परळ, नायगाव आणि भोईवाडा बेस्ट वसाहतीत घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावायला आलेल्या अधिकाऱ्यांना पिटाळून लावले.

आधी पगार वेळेवर करा!कुटुंबीयांनी व्यक्त केला संताप

पालिका प्रशासनाने मेस्माचे आदेश काढल्यानंतर तो बजावण्यासाठी संध्याकाळी अधिकारी वडाळा, परळ, नायगाव आणि भोईवाडा येथे दाखल झाले. मात्र त्यांना बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या रौद्र अवताराला सामोरे जावे लागले. संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. संपकरी कर्मचाऱ्यांना घर रिकामे करायला लावणे म्हणजे कामगारांवर अन्याय करण्यासारखे आहे. बेस्टमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी आधी द्या, त्यांचे पगार महिनोन् महिने रखडलेले असतात, ते वेळच्या वेळी करा आणि मगच अधिकार गाजवा. या सगळय़ा गोष्टी करता येत नाही तर मग तुम्ही आम्हाला घरातून कसे बाहेर काढू शकता, असा सवाल कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी विचारत त्यांना पिटाळून लावले. त्यामुळे कोणतीही नोटीस न बजावता या अधिकाऱ्यांना हात हलवत माघारी फिरावे लागले.

रखडपट्टी

आज दिवसभरात दोनदा महाव्यवस्थापकांबरोबर बैठक पार पडलेली असली तरी कृती समितीने आपले आडमुठे धोरण सोडलेले नाही. संप उद्याही सुरू राहणार असल्याचे कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे उद्याही मुंबईकरांची रखडपट्टी होण्याची चिन्हे आहेत.