रेवदंडा इथं बाईकर्स फेस्‍टीव्‍हलची धूम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। अलिबाग

सध्‍या तरूणाईमध्‍ये बाईकींगचं वेड वाढत चाललं आहे. डोक्‍यावर हेल्‍मेट आणि त्‍यावर छोटा कॅमेरा लावून फिरणारे बाई‍कर्स ठिकठिकाणी पहायला मिळतात. समूहाने बाईकींग करणाऱ्यांची संख्‍या दिवसेंदिवस वाढते आहे. या सर्व बाईकर्सना एकत्र आणून विचारमंथन व्‍हावे, त्‍याचा प्रचार प्रसार व्‍हावा, या हेतूने अलिबाग तालुक्‍यातील रेवदंडा समुद्रकिनारी बाईकर्स फेस्‍टीव्‍हलचं आयोजन करण्‍यात आलं होते.

या फेस्टिव्हलला केवळ राज्‍यभरातूनच नव्‍हे तर देशाच्‍या हैद्राबाद, गुजरात तसेच अन्‍य भागातूनही जवळपास 200 हून अधिक बाईकर्स यात सहभागी झाले होते. यात महिला बाईकर्सची संख्‍याही चांगली होती. जुन्‍या नव्‍या बाईकर्सनी यावेळी आपले विचार मांडले. यानिमित्‍ताने स्‍लो बायकिंग, फायरिंग यांच्‍या छोटेखानी स्‍पर्धाही आयोजीत करण्‍यात आल्‍या होत्‍या. यात महिलांनीही सहभाग घेतला. बाईकींग करताना नेमकी कोणती काळजी घ्‍यावी याबाबतही अनुभवींनी मार्गदर्शन केले.

या निमित्‍ताने कोकणातील निसर्ग सौंदर्य, येथील खाद्यसंस्‍कृती याची ओळख होण्‍याबरोबरच येथील पर्यटन वृदधीसाठी आमचा प्रयत्‍न असल्‍याचे आयोजकांनी सांगितले. इथं येवून खूप काही शिकायला मिळाल्‍याचं नवोदीत बाईकर्सनी सांगितलं.