
सामना प्रतिनिधी । पणजी
गोव्याचा माजी रणजीपटू राजेश घोडगे (47) याचा मैदानावर खेळत असताना ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मडगाव क्रिकेट क्लबने सदस्यांसाठी आयोजित केलेल्या सामन्यादरम्यान ही घटना घडली. नॉन स्ट्राईकवर असताना राजेशला ह्रदयविकाराचा झटका आल्याने तो खेळपट्टीवरच कोसळला.
Rajesh Ghodge was a former Ranji cricketer of Goa https://t.co/l67XEwthMf
— ANI (@ANI) January 13, 2019
मडगाव क्रिकेट क्लब दरवर्षी आपल्या सदस्यांसाठी एक क्रिकेट स्पर्धा आयोजित करते. या स्पर्धेत क्लबचे आजी माजी खेळाडू सहभागी होतात. रविवारी सामना सूरू असताना राजेशला ह्रदयविकाराचा झटका आला. या संघात खेळाडू म्हणून डॉक्टर्सही होते. त्यांनी राजेशवर उपचार केले. तरीही प्रकृती खालवत असल्याचे जाणवल्याने त्याला जवळच्या इएसआय रुग्णालयात नेण्यात आले. येथे उपचारानंतर एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्याला मृत घोषीत करण्यात आले.
राजेशने मडगाव क्रिकेट क्लबकडून राज्यस्तरावर अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून चमकदार कामगिरी केली होती. गोव्यातर्फे राजेशने 1999-2000 दरम्यान दोन सामने खेळले आहेत. तडाखेबाज फलंदाज म्हणून तो प्रसिद्ध होता. मडगाव क्रिकेट क्लबसाठी तो खेळत होता. चार दिवसांपूर्वी गोवा क्रिकेट असोशिएशनच्या स्पर्धेत कुडचडे जिमखानातर्फे खेळताना त्याने अर्धशतक झळकावले होते.
























































