पारनेरमध्ये शेतकर्‍याचा संशयास्पद मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

सामना प्रतिनिधी । पारनेर 

तालुक्यातील करंदी येथे रावजी कारभारी चौधरी वय 51 यांचा त्यांच्याच शेतामध्ये सोमवारी दुपारी संशयास्पद मृतदेह आढळून आला. चौधरी यांचा खून झाला किंवा मृत्यूमागे नेमके कोणते कारण आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. करंदी येथे प्रथमच अशी घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात मिळालेली माहीती अशी की चौधरी हे सोमवारी सकाळी  साडेबारा वाजता त्यांच्या वस्तीमागील शेरी या भागात लसूण तसेच कांद्यास पाणी देण्यासाठी गेले होते. तेथे पाणी देण्यासाठी थोडेच पीक असल्याने ते तेथून का परतले नाहीत म्हणून त्यांची पत्नी शेताकडे  दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास  गेली असता ते शेतामध्ये पडलेले आढळून आले. त्यांनी गावामध्ये त्यासंदर्भात माहीती दिल्यानंतर ग्रामस्थांनी तिथे धाव घेतली. पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर पोलिस  घटनास्थळी दाखल होउन मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

मृतदेह ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी मृतदेहाची पाहणी केली असता चौधरी यांच्या मांडीखाली दोन्ही पायांवर जखमा झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे उत्तर मिळत नसल्याने मृतदेह पुणे येथील ससून रूग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण पुढे येणार असून सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येणार असल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, मृतदेह ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आल्यानंतर तेथे करंदी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. पारनेरला शवविच्छेदन होणार नसल्याने चौधरी यांच्या मृत्यूचे गुढ वाढले असून त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे.