
सामना प्रतिनिधी । पारनेर
दुष्काळ, नापिकी तसेच वाढत चाललेल्या कर्जाच्या बोजाला कंटाळून पारनेर तालुक्यातील दोघांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. याप्रकरणी पारनेर व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भाळवणी येथील नगबेंदवाडी येथील तरूण शेतकरी राजेंद्र दामू रोहोकले वय 35 यांनी सोमवारी रात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेउन जीवनयात्रा संपविली. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडीस आला. बाबू त्रिंबक रोहोकले यांनी यासंदर्भात पारनेर पोलीस ठाण्यात खबर दिल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पारनेर येथील ग्रामिण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर सायंकाळी भाळवणी येथे कै. रोहकले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रोहकले यांच्या पश्चात वयोवृद्ध आई, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
पारनेर शहरातील सतिश केशव औटी वय 47 हे पोटात दुखत असल्याने नगर येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी गेले होते. उपचारानंतर त्यांची पत्नी बिल जमा करण्यासाठी गेल्यानंतर सतिश तेथून निघून गेले. ते बेपत्ता झाल्याची खबर नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी नगर संभाजीनगर रस्त्यावरील शेंडी शिवारातील विहीरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. भिंगार कॅम्प पोलिसांनी मृतदेह विहीरीबाहेर काढून शवविच्छेद केले. परंतु ओळख न पटल्याने बेवारस अवस्थेत त्यांचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात ठेवण्यात आला होता. मंगळवारी वर्तमानपत्रात सतिश औटी यांचे छायाचित्र तसेच वर्णनासह ते बेपत्ता झाल्याचे प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी पारनेर पोलिसांशी संपर्क करून औटी यांच्या आत्महत्येची माहीती दिली. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी नगर येथे जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. सायंकाळी पारनेर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दुष्काळी स्थिती तसेच शेतामध्ये काहीही पिक नसल्याने सतिश यांना चिंतेने ग्रासले होते. त्यांच्यावर काही कर्जही होते. शेतामध्ये पिक नसताना हे कर्ज फेडणार कसे यामुळे ते नेहमी अस्वस्थ असत. अखेर नगर येथे त्यांनी आपली जिवनयात्रा संपविली.

























































