
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
केंद्र सरकारने टीव्हीचे सुटे भाग आणि एईडी पॅनलवर 5 टक्के लावलेला कर आणि आसियान देशांना आयातीत दिेलेली करातील सूट या निर्णयामुळे मेक इन इंडिया योजनेला धक्का बसला आहे. या निर्णयामुळे सॅमसंगसारख्या मोठ्या कंपनीने हिंदुस्थानातील उत्पादन थांबवून आसियान देशांमध्ये टीव्हीचे उत्पादन सुरू केले आहे. आता कंपनी आसियान देशांमधून हिंदुस्थानात टीव्ही संच आयात करणार आहे. सॅमसंगनतंर आता एलजी ही कंपनीही अशाच प्रकारे उत्पादन थांबवण्याचा विचार करत आहे. त्यामुळे मेक इन इंडिया योजनेला धक्का बसणार आहे.
सॅमसंगने चेन्नईमधील युनिटमधील उत्पादन थांबवले आहे. या युनिटमध्ये दरवर्षी सुमारे 10 लाख संच बनवण्यात येत होते. ऑक्टोबरमध्ये सॅमसंगने हे युनिट बंद केले आहे. एलजी कंपनीही असाच निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, सध्यातरी कंपनीकडून उत्पादन सुरूच ठेवण्यात आले आहे. सॅमसंगने गेल्यावर्षीपासून व्हिएतनाममध्ये टीव्ही सेटच्या उत्पादनाला सुरुवात केली आहे. 2017-18 या वर्षात व्हिएतनममधून 16 हजार संच आयात झाले होते. तर 2018 मध्ये हा आकडा सहा लाख संचावर पोहचला आहे. मेक इन इंडियाला बसलेल्या या धक्क्यामुळे सरकार आता 5 टक्के कर रदद करण्याचा विचार करत आहे. या करामुळे देशातील उत्पादनाला मोठा फटका बसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय अर्थ मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतरच घेतला जाणार आहे.

























































