
सामना ऑनलाईन, मुंबई
घाटकोपरमधल्या संजय अगरवाल नावाच्या बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या केली होती. या घटनेला जवळपास 10 दिवस झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी 6 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे सगळे जण घरखरेदीदार असल्याचं कळालं आहे. वेळेत काम पूर्ण न झाल्याने आधीच अगरवाल तणावाखाली होते, त्यात या घर खरेदीदारांनी त्यांचे पैसे परत करण्याची मागणी केल्याने त्रस्त होऊन त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असा आरोप आहे.
अगरवाल यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल पोलिसांनी सहा जणांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहे. यामध्ये संजय वोरा, जितेंद्र जैन, कल्पेश ठक्कर, सचिन ढोलकिया, राज विलास गडकरी आणि किशोर शहा यांचा समावेश आहे. संजय अग्रवाल यांचा मुलगा क्षितीजने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या सगळ्याविरूद्ध आत्महत्येला प्रवृत्त करणे, त्रास देणे, खंडणी मागणे आणि अपमान करणे हे आरोप लावण्यात आले आहेत.


























































