
सामना प्रतिनिधी । पाथर्डी
तालूक्यातील शिराळ ( चिचोंडी ) परिसरातील तुकाराम नामदेव कर्पे यांच्या विहीरीत पडून एका दीड वर्षाच्या बिबट्याचा दुदैवी मृत्यू झाला आहे. याबाबत तिसगाव वनपरिक्षेत्र विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज धनविजय यांनी माहीती देतांना सांगितले की शिराळ येथील तुकाराम कर्पे या शेतकऱ्याची विहीर उदलमलच्या शिवारामध्ये आहे वीस फुट खोल असलेल्या विहीरीमध्ये पाण्याच्या शोधात किंवा भक्षाच्या शोधात आलेला बिबटया रात्रीच्या वेळी विहीरीत पडला. परंतू विहीरीला पाणी असल्याने त्यामध्ये पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला.
विहीरीत बिबट्या पडल्याची माहीती शिराळ ग्रामस्थांनी देताच सहाय्यक वनसंसक्षक किशोर सोनवणे, यांच्यासह वनपाल महेबुब शेख, वनरक्षक मुबारक शेख, वनकर्मचारी के बी वांढेकर या वनकर्मचाऱ्यांसह ग्रामस्थ जाऊन विहिरीत पडलेल्या बिबट्याला सकाळी बाहेर काढून त्याचे तिसगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ हरिचंद्रे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा अंत्यविधी करण्यात आला. यापुर्वी देखील डमाळवाडी परिसरामध्ये पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या बिबट्या विहीरीत पडून मृत्यू झाला होता.





























































