
सामना प्रतिनिधी । पारनेर
सुपे औद्योगिक वसाहतीमधून 5 लाख लिटर पाणी मंजूर होउनही नगरपंचायत पाणीपुरवठा सुरू करण्यास असमर्थ ठरल्याच्या निषेधार्थ विरोधी सदस्यांनी सोमवारी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांच्या आसनांना पुष्पहार घालून आंदोलन केले. दोन दिवसांत पाणी द्या, अन्यथा आम्ही पाणी आणून दाखवितो असे आव्हान माजी उपनगराध्यक्ष अनिकेत औटी यांनी आंदोलानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिले.
औटी म्हणाले, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांनी 11 डिसेंबर रोजी औद्योगिक वसाहतीच्या मुंबईतील अधिकाऱ्यांना पत्र दिल्यानंतर पारनेरसाठी पाच लाख लिटर पाणी मंजूर करण्यात आले. नगरच्या उपअभियंत्यांनी पाणी मंजुरीचे पत्र 9 जानेवारी रोजी नगरपंचायतीस दिले असून जलमापक तसेच नळजोडणीचे साहित्य उपलब्ध करून देण्याचे सूचीत केले होते. त्यानंतर 12 दिवस उलटले तरी काहीही कार्यवाही झालेली नाही. पाणी मंजुरीनंतर सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्रयांनी पाणी मंजूर केल्याचा दावा खोटा असून तसे असते तर औद्योगिक वसाहतीच्या अधिकाऱ्यांनी मंजुरीच्या पत्राची प्रत पालकमंत्र्यांना देणे गरजेचे होते. औटी यांना या पत्राची प्रत देण्यात आली असून ती प्रतच औटी यांनी पत्रकारांकडे सुपूर्द केली. पाणी मंजुरीनंतर पाण्याची चाचणी घेण्यात आल्याच्या दावाही फोल असून केवळ पाइपलाईनची पाहणी करण्यात आली होती. पाणीच मिळाले नसताना चाचणी कशी घेणार असा सवाल औटी यांनी केला. पाणीपुरवठा अभियंता सचिन राजभोज यांनीही चाचणी झाली नसल्याचे मान्य केले.
शहरास सध्या टँकरद्वारे 4 लाख 80 हजार लिटर पाणीपुरवठा करण्यात येत असून औद्योगिक वसाहतीचे 5 लाख लिटर पाणी मिळाल्याने 9 लाख 50 हजार लिटर पाण्यातून पारनेरकरांना पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकतो. मात्र, मंजुरीनंतरही काहीच हालचाली करण्यात आल्या नसल्याने पारनेरकर पाण्यावाचून तहानलेले आहेत. टँकरच्या पुरवठयातही राजकारण करण्यात येत असून विरोधकांना 10 हजार लिटर तर सत्ताधाऱ्यांना 20 ते 30 हजार लिटर पाणीपुरवठा केला जातो. टँकरचालकांना शिवीगाळ केली जाते. त्यामुळे विरोधी नगरसेवकांना स्वतःच्या पैशांतून नागरीकांना पाणी पुरविण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. यावेळी गणपतराव आंबुले, डॉ. मुदस्सिर सययद, किसन गंधाडे, साहेबराव देशमाने, सीमा औटी,घनश्याम औटी, अण्णा औटी, शिरीष साळवे आदी उपस्थित होते.
दुष्काळ कोण माथी मारतंय ?
नगराध्यक्षांवर अविश्वास आणणार किंवा दुष्काळ माथी मारू असे आपण वक्तव्यही केले नसल्याचा खुलासा औटी यांनी केला. एक वर्ष अविश्वास ठरावच आणता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. सत्ताधाऱ्यांचा अभ्यासच नसल्याने ते आपल्यावर बेताल आरोप करीत आहेत. औटी यांच्याकडे जाण्यासाठी उपगराध्यक्ष आडकाठी करत असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितल्याचा गौप्यस्पोटही औटी यांनी केला. पाणी उपलब्ध असताना ते पुरविण्यास असमर्थ ठरलेलेच पारनेरकरांच्या माथी दुष्काळ मारीत असल्याचा आरोप त्यांनी केला.




























































