‘म्हसवड’ चारा छावणीसाठी मुंबईकरांना मदतीची एक हाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

चारा छावणी म्हणजे काय? असा प्रश्न आपणा सर्वांनाच विशेषतः मुंबईकरांना नक्की पडला असेल. अल्पशा पावसाने शेतीत काही पिकत नाही अशावेळी मुक्या जनावरांचे चारा-पाण्या वाचून हाल होऊ लागतात. अशावेळी जनावरे दावणीला हंबरडा फोडतात. प्रत्येक शेतकऱ्याला आपलं पशुधन जगवायचं कसं हा प्रश्न पडतो. अशा वेळी अति दुष्काळी गावातील मुक्या जनावरांना जगविण्यासाठी चारा छावण्या उभारल्या जातात. मुक्या जनावरांला वाचवायचे असते म्हणून ते चारा छावणीमध्ये घेऊन जातात. अशा वेळी छावणी शिवाय शेतकऱ्यांकडे कोणताच पर्याय उरत नाही.

विविध ठिकाणी चारा छावण्या उभ्या करण्याचे हे काम महाराष्ट्र शासन करत असते. परंतु सातारा जिल्ह्यातील म्हसवडमध्ये राज्यात सर्व प्रथम जानेवारी मध्ये चारा छावणी सुरु झाली आहे. आयुष्य जगण्यासाठी लागणाऱ्या अती महत्वाच्या गोष्टी म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा हे आहेतच. मात्र शेतकऱ्याचे पशुधन जगवायचे असेल तर चारा व पाणी आवश्यक आहे. माण तालुका हा दुष्काळी भाग आहे आणि शासनाने माण तालुक्यास दुष्काळी भाग म्हणून घोषित केले आहे. यंदा देखील माण तालुक्यात पुरेसा पाऊस न झाल्याने जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने 1 जानेवारी पासूनच चारा छावणी सुरु झाली असून पहिल्याच आठवड्यात साडेचार हजार जनावरे येऊन येथे दाखल झाली.

दुष्काळ म्हणजे, गावाकडे पाणी नसणे इतकंच काय ते मुंबईकरांना माहित आहे. दुष्काळातील फोटो पाहताना मनातून लाही लाही होते हे नक्कीच. माण देशी फाऊंडेशनने प्रथम 2003 साली चारा छावणी सुरु केली आहे. त्यानंतर २०१२ मध्ये वेगवेगळ्या गावामधून सुमारे चौदा हजार गुरे ढोरे या ठिकाणी जमा झाली होती. पिण्याच्या पाण्याची टंचाई त्यात गुरांना ढोरांना लागणारे पाणी, चारा कसा गोळा करायचा? असे अनेक प्रश्न माणदेशी फाऊंडेशनला पडले होते. त्यावेळी तीन लाख लिटर पाणी मिळविण्यासाठी दोन टॅंकर प्रत्येक दिवसाला यायचे. जनावरांना पाणी मिळाले नाही तर जोरात हंबरडा फोडत. रोजचा 15 किलो चारा, मका, गुरांना लागणारे धान्य सगळं जमा करुन छावणी मध्ये सगळ्यांना सांभाळण्याचा प्रयत्न माणदेशीच्या छावणीतून केला. त्यांच्या समोर असणारे हे मोठं आव्हान पेलले.

जानेवारी 2019 साताऱ्यातील म्हसवड मध्ये माणदेशी फाऊंडेशनने सुरु केलेली चारा छावणी सुरु झाली आहे. यावर्षी सातारा जिल्ह्यातील म्हसवड भाग खूपच भयानक दुष्काळाला सामोरे जात आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामध्ये या वर्षी 30 टक्के पाऊस पडला आहे हेच यामागील मुख्य कारण आहे. या कारणास्तव या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना त्यांची जनावरे विकण्याची वेळ येऊ नये म्हणून माणदेशी फाऊंडेशन चारा छावणी बांधते. यंदाच्या छावणीमध्ये १ जानेवारी पासून सुमारे 8000 जनावरे आणि 1500 कुटुंब राहत आहेत. ही परिस्थिती जानेवारीमध्ये आहे तर येत्या काही महिन्यात काय अवस्था होईल या चिंतेने आम्ही व्यथित आहोत. महाराष्ट्रामध्ये पाय पसरवणाऱ्या दुष्काळाची ही चाहूल असू शकते. असे माणदेशी फाऊंडेशनच्या चेतना सिन्हा सांगतात.

लाखो लिटरमध्ये लागणारे पाणी, चारा, अन्न, काळजी घेण्यासाठी लागणाऱ्या महत्वाच्या सोई-सुविधा या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी मुंबईकरांना एक मदतीची हाक आहे. आपण गावाकडे गेल्यावर आवर्जून गाई, म्हैस, शेळी, कोंबडी, मेंढी यांच्यासोबत फोटो काढतो. त्यांना पाहिले की गावी आल्याचा फिल घेतो. याच गावातील जनावरांना वाचविण्यासाठी, आपल्या शेतकऱ्यांच्या लाडक्या जीवांना वाचविण्यासाठी एक मदतीचा हात मुंबईकरांचा नक्कीच असायला हवा. तेव्हा म्हसवड चारा छावणीला मदत करण्यासाठी. A/C Name – Mann Deshi Foundation Mhaswad Cattle Camp / A/C Number – 0484104000096539 / Bank Name – IDBI Bank / Branch Name – Mhaswad IFSC – IBKL0000484