
सामना ऑनलाईन, हॅमिल्टन
हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाने 1994 सालानंतर न्यूझीलंडमध्ये द्विपक्षीय वन डे मालिका जिंकली खरी पण शुक्रवारी यजमान न्यूझीलंडने टीम इंडियाला आठ गडी व 124 चेंडू राखून हरवून प्रतिष्ठा राखली. हिंदुस्थानची कर्णधार मिताली राज हिने 200वा वन डे सामना खेळून नवा विक्रम रचला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200वा सामना खेळणारी मिताली राज ही पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली हे विशेष. हिंदुस्थानने ही मालिका 2-1ने जिंकली.
हिंदुस्थानकडून मिळालेल्या 150 या माफक धावसंख्येला पाठलाग करणाऱया न्यूझीलंडने अवघे दोन गडी गमावून विजयी लक्ष्य ओलांडले. सुझी बेटस् हिने 57 धावांची आणि कर्णधार ऍमी सॅटर्थवेटने नाबाद 66 धावांची खेळी साकारून न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, त्याआधी न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दीप्ती शर्मा वगळता हिंदुस्थानच्या एकाही खेळाडूला आपली चमक दाखवता आली नाही. तिने चार चौकारांसह 52 धावांची खेळी साकारली. ऍना पीटरसन हिने 28 धावा देऊन चार फलंदाजांना बाद केले. ली तहुहू हिने 26 धावा देऊन तीन फलंदाज बाद केले.
महिला क्रिकेटचे बदलते रूप पाहिले
वयाच्या 16व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱया मिताली राजने शुक्रवारी नव्या विक्रमावर मोहोर उमटवली. 200वा वन डे सामना खेळणारी ती पहिलीच खेळाडू ठरली. यावेळी ती म्हणाली, माझ्या कारकीर्दीत महिला क्रिकेटचे बदलते रूप बघता आले. 200 हा माझ्यासाठी नुसता आकडा आहे. देशासाठी प्रदीर्घ काळ खेळता आले याचा अभिमान आहे.





























































