
सामना प्रतिनिधी । अलिबाग
वीज बिल कमी यावे यासाठी वीज मीटरमध्ये फेरफार करुन जिल्ह्यात वीज चोरी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. अशा वीजचोरांविरोधात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने ठोस कारवाई हाती घेतली आहे. त्यानुसार मुंबई येथील वाशी विभागाच्या पथकाने अलिबाग तालुक्यात असलेल्या आक्षी येथील एम / एस. कुलपे फार्म आणि बीच रिसॉर्ट यांच्यावर वीज चोरीचा ठपका ठेवीत त्यांच्यावर कारवाई केली आहे.
जिल्ह्यात काही महिन्यांपासून वीज चोरीच्या प्रकारात वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील पेण, श्रीवर्धन, अलिबाग, रोहा या तालुक्यात वीज चोरीच्या कारवाया वीज महामंडळा मार्फत करण्यात आलेल्या आहेत. वीज चोरीचे प्रकारांवर आळा घाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने ठोस पावल उचलीत दोषींवर कारवाई करण्यात सुरुवात केली आहे. अलिबाग तालुक्यातील आक्षी गावाच्या समुद्र किनारी एम / एस. कुलपे फार्म आणि बीच रिसॉर्ट आहे. या बीच रिसॉर्ट फार्मवर गोपनिय पध्दतीत वाशी येथील फ्लाइंग स्क्वाड, यांनी मिटर तपासणीसाठी धाड टाकली असता मिटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले आहे. आक्षी बीचवर असलेल्या एम / एस. कुलपे फार्म आणि बीच रिसॉर्टमध्ये वीज मिटरमध्ये पीसीबीवरील सीटी सेकंदात प्रतिरोध आढळला त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी वीज वितरण महामंडळाने ही कारवाई केली आहे.
वीज मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांचे रॅकेटच जिल्ह्यात कार्यरत आहे. वीज वितरण कंपनीने वीजचोरांना आळा घालण्यासाठी विशेष कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. एखादी तक्रार प्राप्त होताच किंवा एखाद्या ग्राहकाचे बील काही महिने अचानक कमी झाल्याचे निदर्शनास येताच, वीज वितरण कंपनीचे अधिकारी त्या मीटरची तपासणी करित आहेत. या तपासणीत मीटरमध्ये फेरफार केल्याचे निदर्शनास आल्यास अशा ग्राहकाला दंड आकारणे तसेच दंड आकारण्यात येतो. मात्र ग्राहकाने हा दंड न भरल्यास त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येते. कुलपे याच्या रिसॉर्टवर वीज चोरीची कारवाई केली असून किती रुपयांची वीजचोरी झाली आहे हे कळले नाही.

































































