
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
नाणार रिफायनरी प्रकल्पाचा अहवाल तयार करण्यासाठी उद्या मंगळवारी सुखथनकर समिती रत्नागिरीत येत आहे. या समितीची शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी उद्या भेट घेऊन प्रकल्पाबाबत विरोधाची भूमिका मांडणार आहेत.
पुढील दोन दिवस सुखथनकर समिती रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार आहे. सकाळी ११ वाजल्यापासून ते प्रकल्पाबाबत ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत. त्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात मंडप घालण्यात आला आहे. आज सायंकाळी आमदार राजन साळवी यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची भेट घेतली. जिल्हाधिकारी म्हणाले की, ही समिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाला तयार करण्याचे सूचित केले आहे त्यानुसार हि समिती आली आहे. राजन साळवी म्हणाले की, ही समिती बेकायदेशीर आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी सभागृहात प्रकल्पाला स्थगिती दिल्याचे जाहिर केले होते त्याप्रमाणे यासमितीला येथे येण्याची गरज नव्हती असे मत साळवी यांनी मांडले.



























































