
सामना प्रतिनिधी । जालना
जालना येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम लोटन देवरे यांनी १ लाखांची गुत्तेदारांना लाच मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे गुत्तेदारी करीत असून त्यांनी बदनापूर तालुक्यातील चिखली, बदनापूर, नानेगाव व गाडेजळगाव, वाकुळणी रस्ता दुरुस्तीचे काम केलेले आहे. सदर रस्ता दुरुस्तीचे काम मजुर सहकारी सोसायटीने मिळालेले असून तक्रारदारांनी सदरची कामे ही सब कॉन्ट्राक्टर म्हणून केलेली आहेत. तक्रारदाराच्या कामाचे बिल २७ लाख रुपयांचे असून त्यापैकी काही बिले देवरे यांनी मंजुर करुन दिले. तेंव्हा तक्रारदार यांच्याकडून देवरे यांनी चार लाख रुपये घेतले होते. तक्रारदार यांचे आठ लाखाचे बिल सार्वजनिक बांधकाम विभाग जालना यांच्याकडून येणे बाकी होते. सदरील कामासाठी तक्रारदार हे कार्यकारी अभियंता देवरे यांना भेटले असता देवरे यांनी बिल काढून देण्या करिता एक लाख रुपये द्या, असे सांगितले. तेंव्हा तक्रारदार हे देवरे यांना म्हणाले की, या अगोदरच मी आपणास चार लाख रुपये दिले आहेत. आता आणखी एक लाख रुपये जास्त होतात.
त्यावेळी देवरे म्हणाले की, ते तुमच्या अगोदरचे बिल काढून दिले आहेत. आता तुमचे राहिलेले आठ लाख रुपये काढून देण्याचे द्यावे लागतील, पैसे दिले तरच तुमचे बिल काढून देईन अन्यथा तुमचे काम होणार नाही. त्यावेळी तक्रारदार हे देवरे यांना म्हणाले की, सद्या माझ्याकडे पैसे नाहीत, पैशाची व्यवस्था करुन येतो. असे म्हणून तक्रारदार हे तेथून निघुन आले.
तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. दरम्यान ३१ जुलै २०१८ कार्यकारी अभियंता देवरे यांच्या राहत्या घरी संभाजीनगर येथे जावून देवरे यांची पंचासमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. पडताळणी दरम्यान पंचासमक्ष कार्यकारी अभियंता देवरे यांनी तक्रारदार यांच्याकडे सदर कामासाठी १ लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन ५ फेब्रुवारी २०१९ रोजी कार्यकारी अभियंता देवरे यांच्या विरुध्द भाजीनगरातील उस्मानपुरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरु आहे.
सदरची सापळा कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधिक्षक जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक रवींद्र डी. निकाळजे, अजिनाथ काशिद, विनोद चव्हाण तसेच कर्मचारी अशोक टेहरे, प्रदीप दैंडे, संतोष धायडे, संजय उदगीकर, गंभीर पाटील, कुदर, महेंद्र सोनवणे,
ज्ञानेश्वर म्हस्के, चालक प्रविण खंदारे यांनी पार पाडली.





























































