
सामना प्रतिनिधी। अलिबाग
रायगड जिल्ह्यातील 90 सार्वत्रिक ग्रामपंचायती निवडणुकीसाठी सरपंच व सदस्य उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात 4 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. 4 फेब्रुवारीला अमावस्या असल्याने हा अशुभ दिवस असल्याने कोणीही अर्ज दाखल केलेले नव्हते. तर आज 5 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग राजकीय पक्षाकडून सुरू होती. आज दिवस अखेर सरपंच 22, सदस्य पदासाठी 134 असे एकूण 154 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
अलिबाग तालुक्यात 25, मुरूड 3, पेण 5,
पनवेल 2, उरण 1, कर्जत 8, माणगाव 10, तळा 5, रोहा 6, महाड 17, श्रीवर्धन 4, म्हसळा 4 अशाएकूण 90 ग्रामपंचयातींमध्ये निवडणूका होणार आहेत. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षाची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. ग्रामपंचायतीची ही निवडणूक म्हणजे लोकसभेची पूर्व तयारी असल्याचे बोलले जात आहे.
4 फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र 4 फेब्रुवारीला पौष महिन्याचा शेवटचा दिवस असून यादिवशी अमावस्या होती. त्यामुळे पौष महिन्यात शुभ कार्य करीत नसल्याने 4 तारखेला कुठल्याही उमेदवाराने आपले अर्ज भरले नव्हते. तर 5 तारखेपासून माघ महिना सुरू होत असल्याने आजचा शुभ मुहूर्त अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पकडला होता.
अलिबाग तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी योग्य नियोजन
अलिबाग तालुक्यात यावेळी सर्वाधिक 25 सार्वत्रिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. ग्रामपंचायत निवडणूक काळात उमेदवारी अर्ज भरताना अनेक वेळा तहसील कार्यालयात दाटीवाटीमध्ये राजकीय पक्षांना अर्ज भरावे लागत होते. मात्र यावेळी तहसीलदार सचिन शेजाळ यांनी कार्यालयाच्या बाहेरील मोकळ्या जागेत मांडव तयार करून प्रत्येक ग्रामपंचायत निहाय एक खिडकी पद्धत तयार केली आहे. त्यामुळे यावेळी सुटसुटीत पद्धतीने उमेदवारांना आपले अर्ज दाखल करता येणार आहेत.
































































