
सामना प्रतिनिधी। मालवण
ऑल इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंट असोसिएशन शाखा सिंधुदुर्गच्या मालवण विभागाची सभा जिल्हाध्यक्ष एस ए डीसोजा यांच्या अध्यक्षतेखाली मालवण धुरीवाडा येथील संस्कार हॉल येथे संपन्न झाली. या सभेत सातवा वेतन आयोग आणि केंद्र सरकारी पेन्शनर याविषयी चर्चा होऊन सातवा वेतन आयोगातील शासनाच्या नव्या आदेशांबाबत माहिती देण्यात आली.
या सभेत पी. के. बागवे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी 80 वर्षावरील पेन्शनर श्री गोपाळ रामचंद्र हुर्णेकर यांचा सत्कार करण्यात आला.
सातवा वेतन आयोग आणि त्याची अंमलबजावणी हा या सभेचा मुख्य विषय होता. सातव्या वेतन आयोगाबाबत शासनाने काढलेल्या नवीन आदेशांबाबत सचिव एम डी जोशी यांनी सविस्तर माहिती दिली. शारीरिक व मानसिकदृष्ट्या दुर्बल मुलांना मिळणारी फॅमिली पेन्शन विवाहानंतर देखील चालु राहणार आहे. कमीत कमी असणारी पेन्शन 1 जानेवारी 2016 पासून रुपये 3 हजार 500 रुपये वरुन 9000 झाली आहे. 1 जानेवारी 2006 पुर्वी 33 वयापेक्षा कमी सेवा झालेल्याना सुद्धा पेन्शन मुळ पगाराच्या 50 टक्के द्यावी. अशा प्रकारचे सुधारित आदेश असुन यामध्ये साधारणपणे 25 वर्षांपेक्षा कमी सेवा झालेल्या लोकांना फायदा होणार आहे. यातील 8 प्रकरणे मंजूर झाली आहेत अशी माहिती जोशी यांनी दिली. तसेच 1 जानेवारी 2006 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या पेन्शनरला सहाव्या वेतन आयोगाने कर्मचाऱ्यांसाठी निर्माण केलेल्या ग्रेड पे चा फायदा मिळालेला नव्हता. संघटनेने 2008 पासुन सातत्याने प्रयत्न केल्यानंतर शासनाने पुर्वीच्या पेन्शनरवर झालेला अन्याय 1 जानेवारी 2016 पासुन ग्रेड पे चा फायदा देऊन पेमेट्रिक्स फॉर्म्युल्यानुसार 1 जानेवारी 2006 पुर्वीच्या सर्व पेन्शनरला सुधारित पेन्शन देण्याची ऑर्डर 12 मे 2017 रोजी निर्गमित केली असुन बऱ्याच पेन्शनरच्या पेन्शनमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये अनेक प्रकरणे मंजुर होऊन आली आहेत असेही श्री जोशी यांनी सांगितले. यावेळी सी. एस. प्रभूआजगावकर यांनीही विचार मांडले. यावेळी बीएसएनएल पेन्शनर्सना मिळणाऱ्या पेन्शनबाबत देखील माहिती देण्यात आली.
































































