लेख : प्रदूषणाचा वाढता भस्मासुर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>केतन भोज<<

वाढत्या प्रदूषणावर उपाय म्हणून समाजाने म्हणजेच सर्वसामान्यांनी प्रदूषणाचा भविष्यातील धोका ओळखून आतापासूनच काही ठाम निर्णय घेतले पाहिजेत आणि व्यक्तिगत पातळीवर आपण प्रत्येक नागरिकाने आपल्या काही सवयी बदलल्या पाहिजेत. सरकारनेदेखील प्रदूषणाविषयी काही धोरण निश्चित करून कारखान्यांतून व वस्त्यांतून वाहून येणाऱ्या सांडपाण्यावर सक्तीने प्रक्रिया करायला लावले पाहिजे.

प्रदूषण हा आजच्या घडीला मानव जीवनातील एक गंभीर समस्यांचा विषय बनत चालला आहे. मागील काही वर्षांपासून प्रदूषण ज्या गतीने वाढत चालले आहे, त्याच गतीने या प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या दुर्गम आजारांना माणूसच नाही, तर सर्वच  भूतलावरील जीवांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हिंदुस्थानी माणूस व्यक्तिगत स्वच्छतेचा जेवढा विचार करतो, त्याच्या शतांशानेदेखील तो सार्वजनिक स्वच्छतेकडे किंवा त्यापासून होणाऱ्या प्रदूषणाकडे लक्ष देत नाही. स्वतःच्या घरातील कचरा तो रस्त्यावर टाकतो, पानाच्या पिचकाऱ्या टाकतो वा निरुपयोगी कागदांचे कपटे कुठेही फेकून देतो. आपल्याकडील भाजीविक्रीच्या मंडया या कचऱ्याच्या ढिगांनी भरलेल्या दिसतात. हे सारे हवेच्या प्रदूषणाला आमंत्रण ठरते. त्यामुळे निसर्गाचा समतोल आपण बिघडवत आहोत याची आम्हाला जाणीवच राहत नाही हे मोठे दुर्दैव मानावे लागेल. कारखान्यांमुळे वायुप्रदूषण होते तसेच कारखान्यातील दूषित, मलीन पाण्यामुळे नद्या व समुद्र यांचे पाणी दूषित होत चालले असून नदी, तलावांना गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील नदी आणि तलावांचे अस्तित्वच नाहीसे होऊ लागले आहे. समुद्रातील या दूषित पाण्यामुळे त्यातील मासे प्रचंड प्रमाणात मृत पावत आहेत. त्यामुळे दुर्मिळ माशांची संख्याही झपाटय़ाने कमी होत चालली आहे. आज महाराष्ट्रातील कित्येक नद्यांतील पाणी दूषित झाल्यामुळे ते पिण्यासाठी किंवा अन्य कोणत्याही कामासाठी ते निरुपयोगी ठरत आहे. पाणी दूषित झाल्यावर ते स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेचा आटापिटा करण्याऐवजी ते दूषित न होण्याची काळजी आजच्या घडीला कोणीही घेताना दिसत नाही. समुद्रातील माशांमध्ये तसेच  भूतलावरील पशुपक्ष्यांच्या व प्राण्यांच्या पोटामध्ये प्लॅस्टिक आढळून आल्याने त्यामुळे ते मृत होत असल्याचे लक्षात येताच, शिवाय प्लॅस्टिक पिशव्यांचा पर्यावरणाला धोका संभवत असल्याकारणाने अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियमानुसार सरकारने महाराष्ट्रामध्ये प्लॅस्टिकचे उत्पादन, वापर, विक्री, साठवण तसेच थर्माकोल इत्यादींच्या वापरावर पूर्ण बंदी घातली. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार प्लॅस्टिकपासून बनवलेल्या ज्या वस्तूंचे विघटन होत नाही अशा वस्तू वापरण्यास मनाई केली. मात्र एवढं करूनसुद्धा प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे थांबलेला नाही. प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सर्रास चालूच असून यावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले दिसत नाही. त्यामुळे प्लॅस्टिक बंदी नोटाबंदीप्रमाणे 100 टक्के अपयशी ठरणारा निर्णय वाटत आहे. हवा, पाणी याबरोबरच ध्वनिप्रदूषण ही आज एक मोठी ज्वलंत समस्या ठरली आहे. विशेषतः शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे गर्दी, गोंगाट आणि वाहनांचे कर्कश आवाज. तसे पाहिले तर आज शहरी भागात माणसांपेक्षा त्याच्या दुप्पट वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषण वाढत आहे. आपली उत्सवप्रियता तर फार अजब आहे. मोठमोठे धार्मिक उत्सव, सण ध्वनिवर्धकांवाचून साजरे होत नाहीत. आपल्याकडे ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी कितीही कठोर कायदे केले तरी आपल्याकडील काही अतिउत्साही मंडळी ते धाब्यावर बसवून मोठय़ा आवाजात डॉल्बी वाजवणे, बँड वाजवणे, दिवाळीमध्ये प्रदूषणाला हानी पोहोचेल अशा बडय़ा आवाजाचे फटाके फोडणे यात धन्यता मानतात. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाला निमंत्रण मिळत असून पर्यावरणालादेखील अधिकाधिक धोका संभवत चालला आहे.

पृथ्वीच्या भोवती असलेल्या वायूंच्या आवरणात ओझेन वायूचा एक थर आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टीचे संरक्षण होण्यासाठी हा वायू आवश्यक आहे. पृथ्वीवरील वाढत्या प्रदूषणामुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत असून हा वायू ओझोनवर अतिक्रमण करत आहे आणि या हल्ल्यात ओझोन नष्ट झाला तर सूर्याची अल्ट्राव्हायोलेट किरणे पृथ्वीवर येतील व येथील जीवसृष्टी पार नष्ट होईल अशी भीती आज निर्माण झाली आहे. या प्रदूषणावर उपाय म्हणून समाजाने म्हणजेच सर्वसामान्यांनी प्रदूषणाचा भविष्यातील धोका ओळखून आतापासूनच काही ठाम निर्णय घेतले पाहिजेत आणि व्यक्तिगत पातळीवर आपण प्रत्येक नागरिकाने आपल्या काही सवयी बदलल्या पाहिजेत. सरकारनेदेखील प्रदूषणाविषयी काही धोरण निश्चित करून कारखान्यांतून व वस्त्यांतून वाहून येणाऱ्या सांडपाण्यावर सक्तीने प्रक्रिया करायला लावले पाहिजे. अशा तऱहेने प्राप्त झालेले पाणी बागेसाठी, शेतीसाठी व गाडय़ा धुण्यासाठी वापरता येऊ शकते. जलप्रदूषण म्हणजे पाण्याच्या स्रोतांचे प्रदूषण. जलप्रदूषण ही एक मानवनिर्मित समस्या आहे.

प्रामुख्याने म्हणजे अशुद्ध पाण्याची निर्मिती कमीत कमी प्रमाणात कशी होईल याची काळजी सर्वांनी घेणे महत्त्वाचे आहे. याशिवाय मलनिस्सारण प्रकल्प उभारायला हवेत. प्लॅस्टिकच्या वापरावर सरकारने काही कठोर बंधने आणली आहेत. त्याला नागरिकांनीही स्वतःहून योग्य ते सहकार्य करून सर्वांनी प्लॅस्टिक पिशवीऐवजी कापडी पिशवी वापरण्याची सवय सक्तीने लावून घेतली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी ध्वनिवर्धक वापरणे आपण स्वतः टाळले पाहिजे. विविध धार्मिक सण, उत्सवामध्ये अथवा आपल्या कौटुंबिक सोहळ्यांमध्ये आनंद व्यक्त करण्याच्या आपल्या पद्धतीतही आपण बदल केला पाहिजे. डॉल्बीवर गाणी वाजवणे किंवा कार्यक्रमाच्या वेळी फटाके फोडणे या प्रकारांनीच आनंद व्यक्त होतो हे आपण विसरले पाहिजे. हे सर्व कठीण वाटले तरी आपण हे उपाय केले पाहिजे आणि अमलातही आणले पाहिजेत. कारण आता आपल्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहिला आहे. आपण हे सर्व आता केले तरच आपले जीवन निरोगी सुखकर होऊन आपण चांगले निर्मळ आयुष्य जगू शकतो आणि आपल्या पुढच्या पिढय़ाही प्रदूषणापासून सुरक्षित राहू शकतात.