
मंगेश सौंदाळकर । मुंबई
चोरांचे आता काही खरे नाही. पाकीट मारून, सोनसाखळी खेचून पळणाऱया चोरांची गचांडी वळायला पोलीस त्यांच्यापर्यंत वेगाने पोहोचू शकणार आहेत. मुंबई पोलिसांच्या ताफ्यात लवकरच ई-सायकल दाखल होणार आहे. बॅटरीवर चालणारी ही सायकल साध्या सायकलपेक्षा वेगवान आहे आणि बॅटरी संपली तरी पोलीसमामा पॅडल मारून तिचा गस्तीसाठी वापर करू शकतील. मुंबई पोलीस पहिल्यांदाच या सायकलवर टांग टाकणार आहेत.
मुंबईतील चौपाटय़ांवर पोलिसांनी सायकलवरून गस्त सुरू केली. गेल्या वर्षीपासून मरीन ड्राइव्ह परिसरात गस्तीकरता पहिल्यांदाच पोलिसांनी इको फ्रेंडली सॅग-वेचा वापर सुरू केला. आता ई-सायकलचा वापर केला जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर एक ई-सायकल नुकतीच पोलिसांच्या ताफ्यात आली आहे. नागपाडा येथील मोटार परिवहन विभागात या सायकलवर चाचण्या केल्या जातील आणि त्यानंतर पोलिसांना ही ई-सायकल चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
ई-सायकलने रात्रीच्या वेळी चिंचोळ्या गल्लीत पोलीस सहज गस्त करू शकतील. लांब पल्ला ई-सायकलमुळे सहज पार करतील. लवकरच या सायकलच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे.
– देवेन भारती, सहआयुक्त (कायदा-सुव्यवस्था)
लवकरच पाच सॅग-वे पोलिसांच्या ताफ्यात
मरीन ड्राइव्ह येथे गस्तीकरता उपयुक्त ठरलेल्या सॅग-वेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या मुंबई पोलिसांकडे 2 सॅग-वे आहेत. त्यात आणखी पाच सॅग-वेची भर पडली आहे. परिमंडळनिहाय त्यांचे वाटप होईल. विशेषकरून गर्दीच्या आणि पर्यटनाच्या ठिकाणी त्यांचा वापर होणार आहे.
काय आहे ई-सायकल
ई-सायकल बॅटरी आणि पॅडलवर चालते. साधारणपणे एक तास चार्ंजग केल्यावर दोन ते अडीच तास ही सायकल ताशी 30-40 किलोमीटरच्या वेगाने पळू शकते. वेगावर सहज नियंत्रण ठेवण्याची सुविधाही त्यात आहे. तिला ऍक्सेलेटरही आहे. ही सायकल सेमी मॅन्युअल असून इलेक्ट्रिक किंवा पॅडलची सुविधा आहे. 70-80 किलो वजनापर्यंतची व्यक्ती ही सायकल सहज चालवू शकते. पॅडलवर सायकल चालवल्यामुळे पोलिसांचा व्यायामही होईल.


























































