सब्‍जापासून सुगंधी तेलाचे उत्‍पादन: जनसेवा फाऊंडेशन आणि सीमैपमध्ये अगरबत्ती करार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । शिर्डी

फुलांपासून उदबत्ती तयार करण्‍याचा प्रकल्‍प यशस्‍वी झाल्‍यानंतर जनसेवा फाऊंडेशनच्‍या माध्‍यमातून साई मंदिरात जमा होणाऱ्या सब्‍जापासून सुगंधी तेलाचे उत्‍पादन करण्‍यास प्रारंभ झाला आहे. यासाठी जनसेवा फाऊंडेशन आणि सीमैप (सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ मेडिसनल अॅन्‍ड अॅरोमॅटिक प्‍लॅन्‍ट) यांच्‍यामध्‍ये करार झाला असून या सुंगधी तेलाचा उपयोग अगरबत्ती आणि सुंगधी धुप यांची निर्मित करण्‍यात होणार असल्‍याची माहीती जनसेवा फाऊंडेशनच्‍या विश्‍वस्‍त व जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी दिली.

काही दिवसांपुर्वीच जनसेवा फाऊंडेशन आणि श्री साईबाबा विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था यांच्‍यामध्‍ये झालेल्‍या करारानंतर श्री साईबाबांच्‍या मंदिरात समाधिस्‍थानावर भक्‍तांकडून वाहण्‍यात येणाऱ्या फुलांपासून उदबत्ती तयार करण्‍याचा उपक्रम यशस्‍वी झाला आहे. संपूर्ण देशात या उदबत्ती उत्‍पादनास मोठा प्रतिसाद मिळाला असून, दिवसागणीक या उदबत्‍यांची मागणीही वाढत असल्‍याचे विखे पाटील यांनी सांगितले.

श्री साईबाबा मंदिरात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या हारांमध्‍ये सब्‍जाचा वापर केला जातो. सब्‍जाकडे औषधी वनस्‍पती म्‍हणून पाहिले जाते. या वनस्‍पतीचा उपयोगही कशा पध्‍दतीने करता येईल याचा विचार जनसेवा फाऊंडेशनच्‍या माध्‍यमातून सुरु होता. लखनौ येथे सीमैप (सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ मेडिसनल अॅन्‍ड अॅरोमॅटिक प्‍लॅन्‍ट) यांच्‍यावतीने दोन दिवसांचे किसान संमेलन आयोजित करण्‍यात आले होते. या संमेलनात जनसेवा फाऊंडेशन आणि सीमैप यांच्‍यात अॅरोमा मिशन करीता करण्‍यात आला असल्‍याचे जनसेवा फाऊंडेशनच्‍या वतीने सांगण्‍यात आले. याप्रसंगी आय.सी.ए.आर.च्‍या डायरेक्‍टर जनलर डॉ. मंगला रॉय, संचालक डॉ.ए.के त्रिपाठी, डॉ.संजय कुमार, डॉ. श्रीवास्‍तव, कृषि शिक्षण विभागाचे संचालक डॉ. खेतमाळस, बाभळेश्‍वर कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्‍त्रज्ञ डॉ. नालकर, जनसेवा फाऊंडेशनच्‍या प्रकल्‍प प्रमुख सौ. रुपाली लोंढे यांच्‍यासह उपस्थित होते.

श्री साई मंदिरात जमा होणाऱ्या सब्‍जापासून सुगंधी तेल निर्माण करण्‍यात येत असून, या तेलाचा उपयोग उदबत्ती, धुप यांच्‍या निमितीसाठी होत करण्‍यात येत आहे. शिर्डी आणि परिसरात सब्‍जाप्रमाणेच औषधी वनस्‍पतींच्‍या लागवडीकरता शेतकऱ्यांना सीमैपच्‍या माध्‍यमातून प्रोत्‍साहीत करण्‍यात येणार असल्‍याचे सौ. विखे पाटील यांनी सांगितले.