
सामना प्रतिनिधी । मुंबई
ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये म्हणजेच मुळ्ये काका यांच्या भन्नाट संकल्पनेतून सुरू झालेला ‘माझा पुरस्कार 2019’ हा सन्मान सोहळा येत्या बुधवारी 13 फेब्रुवारीला दादरच्या शिवाजी मंदिर नाटय़गृहात सायंकाळी 7.30 वाजता रंगणार आहे.
यंदा विनोदी नाटकासाठीचा पुरस्कार प्रशांत दामलेच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाला जाहीर झाला आहे, तर याच नाटकासाठी अतुल तोडणकर याला विनोदी अभिनेत्याचा तर प्रतीक्षा शिवणकरला विनोदी अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रतीक्षाचं हे रंगभूमीवरचं पदार्पणातलं नाटक आहे. नाटय़लेखन आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ‘डियर आजो’साठी मयुरी देशमुख हिला तर सहाय्यक अभिनेता म्हणून सतीश राजवाडेचा सन्मान ‘अ परफेक्ट मर्डर’साठी होणार आहे. ‘चला हवा येऊ द्या’ फेम नीलेश साबळे आणि श्रेया बुगडे यांना विशेष माझा पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. पत्रकार आरती कदम यांनाही सन्मानित करण्यात येईल. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेते संजय मोने करतील.
यावेळी ‘गाणी गोड प्रेमाची’ या संकल्पनेवर आधारित हिंदी-मराठी प्रेमगीते सादर केली जातील. नीलिमा गोखले, जयंत पिंगुळकर, ऋषिकेश अभ्यंकर, अद्वैता लोणकर, केतकी भावे-जोशी हे नामवंत गायक कलाकार ही गीते सादर करणार आहेत, तर संगीत संयोजन प्रशांत लळीत यांचं आहे.
मित्रपरिवाराचा मदतीचा हात
पुस्कार विजेत्यांची निवड अशोक मुळ्ये यांची एक सदस्यीय समिती करत असते. सोहळ्यासाठी कोणतेही प्रायोजक नसून मुळये काकांच्या मित्रपरिवाराकडूनच याचा आर्थिक भार उचलला जातो. हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्टय़ आहे. रसिकांसाठी मोजक्याच विनामूल्य प्रवेशिका 9 फेब्रवारीपासून नाटय़गृहावर सकाळी 8.30 ते 11 आणि सायंकाळी 5 ते 8 या वेळेत मिळतील.

























































