
>> विवेक दिगंबर वैद्य
1870 च्या दशकात श्रीस्वामी समर्थ आणि श्रीमाणिकप्रभू यांचे समकालीन असणारे प्रसिद्ध सिद्धसत्पुरुष श्रीअण्णाबुवा यांचा परिचय करून देणारा लेख.
ज्याचे सर्वांग श्वेतकुष्ठ रोगाने व्यापले होते असा एक ब्राह्मण अक्कलकोट येथे श्रीस्वामी महाराजांच्या दर्शनास आला आणि शरीरव्याधीपासून मुक्त होण्याची इच्छा मनात धरून त्यांची नित्य उपासना करू लागला. ब्राह्मणाचा मनोदय जाणून घेत श्रीस्वामी समर्थांनी त्यास सांगितले, ‘येथून पश्चिमेस कृष्णाकाठी ‘मिरज’ येथे ‘दत्त दिगंबर अण्णाबुवा’ नावाचे थोर सत्पुरुष आहेत, त्यांस शरण जावे आणि रोगमुक्त व्हावे!!’
श्रीस्वामींच्या सूचनेनुसार मिरज येथे अण्णाबुवांच्या शोधार्थ आलेल्या ब्राह्मणाच्या शरीरव्याधीकडे पाहून त्यास कुणी तेथे थारा दिला नाही. बऱयाच पायपिटीनंतर तो ब्राह्मण एका मंदिरापाशी आला. तेथे भजन चालले होते. उपस्थित मंडळी भजनात दंग होती, इतक्यात एकाएकी अण्णाबुवा उभे राहिले आणि म्हणाले, ‘लचांड आले रे लचांड!’ आपण ज्यांच्या शोधार्थ फिरत आहोत ते अण्णाबुवा हेच आहेत हे उमगल्यावर ब्राह्मणाने चटदिशी बुवांचे चरण धरले. त्याचा मनोदय जाणून घेत बुवांनी, ‘नित्यनेमाने मिरजेतील तळय़ाच्या गणपतीसमोर कीर्तन करावे’ अशी त्यास आज्ञा दिली. ब्राह्मणाने लागलीच कीर्तन करण्यास प्रारंभ केला. पुढे चार दिवसांनी कीर्तन रंगात आले असता एकाएकी अण्णाबुवा तिथे आले आणि त्यांनी ब्राह्मणाच्या कंबरडय़ात लाथ घातली. या प्रसंगामुळे तो ब्राह्मण मनात खट्टू झाला असला तरीही काही दिवसांतच त्याचे श्वेतकुष्ठाने भरलेले शरीर पूर्ववत झाले आणि तो रोगमुक्त ब्राह्मण समाधानाने माघारी परतला.
उत्तम प्रकारच्या वाद्यनिर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘मिरजे’च्या शनिवार पेठेतील सतारमेकर गल्ली म्हणजे स्वर्गीय सुरांचा ‘वाद्यमेळ’. येथे अध्यात्माचा ‘अनाहत’ नाद जागवीत स्थिरस्थावर झालेल्या ‘दत्तदिगंबर’ अण्णाबुवांचा जन्म कोल्हापूरच्या ईशान्येला, पन्हाळय़ाच्या पायथ्याशी असलेल्या ‘मनपाडळे’ (मंडपाळे) गावी झाला. श्री रामदास स्वामी स्थापित अकरा मारुतींपैकी ‘एक’ अशी ख्याती असलेल्या ‘मनपाडळे’ गावातील महादजीपंत-अनसूया कुलकर्णी या दाम्पत्याच्या पोटी अण्णाबुवांचा जन्म झाला. नवजात बालकाचे नाव ‘दत्तदिगंबर’ ठेवण्यात आले याचे कारण बाळाचे तेजस्वी डोळे, भ्रूमध्यावर रेखलेली जन्मजात खूण, कंठावरील तीळ आणि आजानुबाहू. हे बालक अल्पावधीतच त्याच्या बालसुलभ लीलांमुळे सर्वांना आपलेसे करते झाले.
पाच वर्षांचा होईपर्यंत दत्तदिगंबर त्याच्या बोबडय़ा मधुर बोलांनी जन्मदात्रीस आणि भोवतालच्या अन्य मातृस्वरूप स्त्राrवर्गास रिझीत असे. पुढे महादजीपंतांनी मुक्रर केलेल्या पंतोजींचे बोट धरून दत्तदिगंबर धूळपाटीवर ‘श्रीगणेशा’ लिहिता झाला. येथून पुढे आश्चर्यकारकरीत्या त्याची वाणी व उच्चार सुधारले. अनेकविध श्लोक आणि ऋचा तो घडाघडा म्हणत असे. यथावकाश त्याचे नाव शाळेत घालण्यात आले. काही काळ नित्यनेमाने शाळेत जाणारा आणि अभ्यासात रमणारा दत्तदिगंबर एकाएकी शाळेत जाण्याऐवजी रानावनात जाऊन एकांतात ध्यानधारणा करू लागला. घरातून ‘शाळेला’ जातो असे सांगून दत्तदिगंबर प्रत्यक्षात मात्र गावाबाहेरील जंगलात जाई व तेथे ध्यान लावून बसे. कालांतराने ही गोष्ट शिक्षकांनी घरातील मंडळींच्या लक्षात आणून दिली. मातापित्यासाठी हा चिंतेचा विषय होता.
अशातच आठवे वर्ष लागल्याने दत्तदिगंबराचे मौंजीबंधन करण्याचे घरच्यांनी ठरविले. सर्व तयारी झाली, मात्र दत्तदिगंबर मुंजीसाठी उभा राहिना. ‘आपण ब्रह्मरूप आहोत, स्वयंसिद्ध आहोत त्यामुळे मौजीबंधनच नव्हे तर अन्य कोणतेही बंधन आम्हांस मान्य नाही’ असे सांगून दत्तदिगंबराने मुंजीसाठी येण्यास नकार दिला. अखेर जुन्या जाणत्यांनी वडीलकीच्या नात्याने मध्यस्थी केल्यामुळे दत्तदिगंबर मनाविरुद्ध मुंजीच्या मांडवात दाखल झाला. हा प्रसंग घरच्या मंडळींनी कसाबसा निभावला असला तरीही यानंतर दत्तदिगंबराचा लहरी स्वच्छंदपणा, बालोन्मत्तस्वैरवृत्ती, बेबंद वर्तन, संदर्भहीन वाटणारे, मात्र काही काळानंतर प्रत्यक्षात साकारणारे बोलणे आणि त्याच्या हातून घडणाऱया अनाकलनीय अतर्क्य लीला ग्रामस्थांचे त्याच्याविषयीचे मत ‘प्रतिकूल’ होण्यास कारणीभूत आणि पुरेशा ठरल्या. दत्तदिगंबरामधील हे बदल दैवी वा आध्यात्मिक स्वरूपाचे नसून ‘चेटूक’ किंवा ‘समंध’ बाधा असावी असा कयास ग्रामस्थांनी बांधला आणि महादेवपंतांना दत्तदिगंबरास ‘नरसोबाच्या वाडीस’ नेण्याचा सल्ला दिला. अखेर हताश झालेल्या मातापित्यांनी दत्तदिगंबरासह श्रीनृसिंहवाडी गाठली.
नरसोबाच्या वाडीस आल्यावरही दत्तदिगंबराची स्वैरवृत्ती कायम राहिली. ‘येथील दत्त मीच असून या पादुकादेखील माझ्याच आहेत’ असे ठामपणे सांगणारा दत्तदिगंबर वाडी परिसरामध्ये चेष्टेचा विषय झाला असला तरीही एकदा रात्री स्वप्नदृष्टांताच्या माध्यमातून त्याच्या मातापित्यांना साक्षात श्रीदत्तात्रेयांनी आश्वस्त केले आणि सांगितले, ‘आपण जन्मदाते आहात तरीही ‘दत्तदिगंबर’ हे माझे रूप आहे हे जाणून त्याच्याविषयीचा मोह सोडावा आणि माघारी परतावे. यापुढे तो तुमचा नाही. त्याचा प्रतिपाळ मी करेन. त्यास मायेच्या बंधनात अडकवू नये. कारण त्याचा जन्म जगदुद्धारासाठी झालेला आहे.’ अनसूयाबाई अन् महादजीपंतांना एकाच वेळी हा स्वप्नदृष्टांत घडला.
स्वप्नदृष्टांतामागील रहस्य आणि दैवी संकेत उमगल्यावर पतीपत्नी उभयता जड अंतःकरणाने आणि भरल्या डोळय़ांनी ‘दत्तदिगंबरास’ वाडीस एकटे सोडून माघारी परतले. पुढील काळात वाडीमधील काही विघ्नसंतोषी मंडळींनी पोरक्या दत्तदिगंबराचे अनन्वित हाल केले. मात्र त्याचवेळी अनेकांना त्याच्या दैवी सामर्थ्याची प्रचीतीदेखील येती झाली. दरम्यान वाडी क्षेत्री ‘अण्णाबुवा’ नावाने परिचित झालेल्या दत्तदिगंबराचा शोध घेत अपत्यप्राप्तीसाठी आसुसलेला कुणी एक सावकार ‘वाई’ येथून आला. कुलदेवतेच्या स्वप्नदृष्टांतानुसार वाडी येथे आलेल्या त्या सावकाराची मनोकामना पूर्ण झाल्यामुळे दत्तदिगंबर अण्णाबुवांची प्रसिद्धी अल्पावधीतच पंचक्रोशीची वेस ओलांडती झाली.
कालांतराने, केशवराव कुळकर्णी-म्हैसाळकर तथा ‘श्रीकेशवानंद’ (निस्सिम शिष्य आणि ‘मिरज श्रीगुरुकथामृत’ या अण्णाबुवांच्या आद्यचरित्राचे लेखक) यांच्यामुळे अण्णाबुवा ‘म्हैसाळ’ येथे आले आणि विविध लीलाप्रसंगातून ख्यातकीर्त होत पुढे ‘मिरज’ येथे कायमचे स्थिरावले. मिरजेच्या बाळाराम पुरुषोत्तम शहा यांना धंद्याच्या नुकसानीतून सुखरूप बाहेर काढल्याने शहा कुटुंबीयांची अण्णाबुवांवर निष्ठा जडली. आषाढ शु. 4 शके 1794 (9 जून 1872) रोजी समाधिस्थ झालेल्या अण्णाबुवांचे स्मृतीमंदिरही बाळाराम शेठजींनीच उभारले.
वि. गो. साठय़े यांनी लिहिलेले ‘श्रीदत्तदिगंबर अण्णाबुवा महाराज चरित्र’ सर्व भाविकांनी विशेषतः दत्तसंप्रदायिकांनी आवर्जून वाचावे तसेच मिरजेच्या शनिवार पेठेतील ‘श्रीअण्णाबुवा देवालय’ या श्रीअण्णाबुवा स्मृतीस्थळाला अगत्याने भेट द्यावी हीच प्रार्थनापूर्वक विनंती.





























































