
>> प्रमोद कांबळे, चित्र-शिल्पकार, नगर
दिवंगत समाजसेवक नानाजी देशमुख यांना नुकताच भारतरत्न किताब जाहीर झाला. चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळे यांना चित्रकूट येथील नन्ही दुनिया या प्रकल्पाच्या निमित्ताने नानाजींचा सहवास लाभला. या आठवणी मांडणारा हा लेख.
शेकडो कलाकारांमधून झाली निवड
‘नन्ही दुनियां’तील प्राणिशिल्पांच्या कामासाठी नानाजी देशमुख यांनी माझीच निवड का व कशी केली याचे कोडे मला सुरुवातीपासून पडले होते. या प्रकल्पाचे काम सुरू केल्यानंतर एका भेटीत मी नानाजींचा याबाबत विचारले. त्यांनी माझ्यासमोर देशातील 500 ते 600 कलाकारांची नावे, पत्ता, त्यांची कामे असलेली यादीच समोर ठेवली. नानाजींच्या टीमने सर्वच कलाकारांची कुंडली जमा केली होती. मलाही त्यांच्या टीमचे सदस्य कधीतरी भेटून गेले होते, हेही मला त्यांच्याकडूनच कळले. त्यांनी सांगितलेली निवड प्रक्रिया ऐकून मला माझ्या कलेचे चीज झाले असेच मनोमन वाटले.
भारतरत्न व मी…
एक कलाकार म्हणून माझ्या कलेने मला अनेक मानसन्मान दिले, लोकांचे निरपेक्ष प्रेम दिले. यातही अधिक आनंदाची बाब म्हणजे मला भारतरत्नांबरोबर काम करण्याची, त्यांचा सहवास लाभण्याची संधी मिळाली. भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, दिवंगत राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम, पंडित भीमसेन जोशी, नानाजी देशमुख अशा दिग्गजांचे सान्निध्य मला काही काळ, काही क्षणांपुरते मिळाले आहे. एखादी कला तुम्हाला आयुष्यात काय देऊ शकते याचे दुसरे उदाहरण नसेल. या प्रत्येक भारतरत्नाकडून मला साधेपणाची व ध्येयाप्रती निष्ठा ठेवून काम करण्याची मिळालेली शिकवण माझी सर्वोच्च कमाई असल्याचे मी मानतो.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर होणाऱया देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या पद्म पुरस्कारांकडे समस्त देशवासीयांचे लक्ष लागलेले असते. यावर्षीही हे पुरस्कार केंद्र सरकारने जाहीर केले. त्यात भारतरत्न हा देशातील सर्वोच्च किताब नानाजी देशमुख यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला. रोजचे काम करीत असताना आलेली ही बातमी ऐकली आणि अक्षरशः हृदयापासून एकच प्रतिक्रिया मनात उमटली.. क्या बात है! संपूर्ण आयुष्य देशासाठी, जनसामान्यांच्या उन्नतीसाठी वेचणाऱया या ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचा व माझा तसा थेट संबंध येणे शक्य नव्हते. मात्र माझ्या कलेची दुनिया मला नानाजींच्या चित्रकूट येथील नन्ही दुनियेत घेऊन गेली होती. 2004 मध्ये नानाजींचे कार्यक्षेत्र असलेल्या मध्य प्रदेशातील चित्रकूट येथे माझा व त्यांचा पहिला परिचय झाला. तेथील ‘सियाराम कुटी’त झालेली ही पहिली भेट आजही स्मरणात आहे. पांढरीशुभ्र दाढी, डोळ्यांवर चष्मा, प्रसन्नचित्त चेहरा, आश्वासक स्मित व एका वेगळ्याच तेजोवलयाचा भास करून देणाऱया नानाजींना पाहिल्यावर मी भारावून गेलो. त्यांनी आपुलकीने केलेली विचारपूस नगर ते चित्रकूटदरम्यान केलेल्या तब्बल 1400 किलोमीटरच्या प्रवासाचा शिणवटा दूर करून गेली. चित्रकूटमध्ये त्यांनी साकारलेल्या ‘नन्ही दुनियाँ’ प्रकल्पासाठी मी प्राणीशिल्पे तयार करून दिली होती. या कामानिमित्त मिळालेला नानाजींचा सहवास, त्यांच्या उदात्त कार्याचा प्रत्यक्ष झालेला परिचय माझ्या आयुष्यासाठी विचारांची मोठी शिदोरी ठरला आहे.
माझा व नानाजींचा प्रत्यक्ष परिचय होण्यापूर्वी मला त्यांच्या कार्याबद्दल वर्तमानपत्रातून माहिती होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले राष्ट्रवादी विचारवंत तसेच जनसंघाचे दिग्गज नेते म्हणून त्यांची ओळख होती. राजनीतीतील चाणक्य म्हणून त्यांचा दिल्लीत दबदबा होता, अनेक महत्त्वाची सत्तापदे त्यांच्याकडे सहजगत्या येत होती, पण त्यांनी तो मोह निग्रहाने नाकारून, राजकारण संन्यास घेऊन अखंडपणे सेवाकार्य करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मध्य प्रदेशातील दुर्गम भाग असलेल्या चित्रकूटला आपले कार्यक्षेत्र बनवले. अशा अनेक गोष्टींमुळे त्यांच्याबद्दल मनात एक आदरयुक्त भावना होतीच, परंतु त्यांच्याशी कधी थेट संपर्क येईल असे वाटले नाही. माझी कलाक्षेत्रातील नित्य कामे चालू असताना जानेवारी 2004 मध्ये एके दिवशी मला एक फोन आला. भरत पाठक नावाचे व्यक्ती फोनवर बोलत होते व त्यांनी मला हिंदीत सांगितले की, ‘‘प्रमोद कांबळेजी बोल रहे हो? आपको नानाजीने कुछ काम के लिए चित्रकूट बुलाया है’’. मला सुरुवातीला थोडे आश्चर्यच वाटले. मात्र नानाजींचे नाव ऐकल्यावर मी पाठक यांना येऊन जाईन, असे सांगितले. आठदहा दिवसांनी पुन्हा एकदा पाठकांचा फोन आला. त्यांनी माझे बोलणे थेट नानाजींशी करून दिले. नानाजींनी अतिशय मृदू भाषेत माझी ख्यालीखुशाली विचारून ‘एका कामासाठी चित्रकूटला याच,’ असा आग्रह केला. एवढय़ा मोठय़ा व्यक्तीकडून आलेले बोलावण टाळणे आता मला शक्यच नव्हते. शेवटी मी चित्रकूटला निघालो. नागपूरहून मध्य प्रदेशात गेल्यावर ‘सतना’मध्ये पोहोचलो. सतना ते चित्रकूट तसे पाहिले तर फक्त 80 किलोमीटरचेच अंतर आहे, परंतु हा संपूर्ण रस्ता त्यावेळी ओबडधोबड होता व महत्त्वाचे म्हणजे पूर्णतः घनदाट जंगलातून जाणारा होता. नीलगाई, वानरे, सांबार असे अनेक वन्य जीव आमच्या मार्गात ठिकठिकाणी पाहायला मिळाले. इतके घनदाट जंगल व निसर्गात मुक्तपणे संचार करणारे इतके वन्य जीव प्रत्यक्ष जवळून पाहण्याची ही तशी पहिलीच वेळ असल्याने आमच्या मनात एक धाकधूकही होती. या प्रवासात मनुष्यप्राण्याच्या तुलनेत वन्य जीवच अधिक दिसले.
अखेर पाचसहा तासांच्या प्रवासानंतर एकदाचा चित्रकूटला पोहोचलो. तेथील लोकांनी स्वागत करून मला नानाजींच्या भेटीसाठी त्यांचे वास्तव्य असलेल्या सियाराम कुटीत नेले. व्हीलचेअरवर बसलेल्या नानाजींचे प्रथम दर्शन झाले व मी त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वाने अक्षरशः भारावून गेलो. त्यांनी अतिशय आस्थेने क्षेमकुशल विचारून जेवण करून थोडा वेळ आराम करण्याचा सल्ला दिला व दुपारी भेटून सविस्तर बोलू असे सांगितले. त्यानंतर झालेल्या भेटीत त्यांनी त्यांच्या ‘नन्ही दुनिया’ प्रकल्पाची माहिती दिली. त्यांनी आदिवासी, दुर्गम भागातील मुलांसाठी उभारलेल्या ‘नन्ही दुनिया’ शाळेच्या परिसरात त्यांना वन्य जीवांच्या शिल्पाकृती साकारून एक अनोखी दुनिया साकारायची होती. आई व तिचे तान्हुले हा समस्त सजीव सृष्टीचा अविभाज्य भाग आहे. केवळ माणसांमध्येच नाही तर प्राण्यांमध्येही आई व तिचे मूल असे गहिरे रंग असलेले नाते असते. याच संकल्पनेवर त्यांना वाघ, सिंह, हत्ती, जिराफ, गेंडा असे सर्व प्राणी माता व मूल या रूपात साकारायचे होते. त्यांची ही संकल्पना मलाही प्रचंड भावली, मनाला भिडली. त्यांच्या समवेत सर्व परिसर फिरून झाल्यावर मी रात्री मुक्कामी असताना काही स्केचेस काढले. त्यासाठी त्यांनी मला पुस्तकांचा एक भलामोठा गठ्ठाच दिला. कोणतेही प्राणिशिल्प हिंस्र रूपात नको तर मायेच्या ममतेच्या रूपात पाहिजे असा त्यांचा विशेष आग्रह होता. बारीकसारीक तपशील त्यांनी मला सांगितले. नानाजींचा आग्रह पाहून मीसुध्दा या कामाचे आव्हान स्वीकारून स्वतःला झोकून दिले. आतापर्यंत प्राणिशिल्पांबाबत सरधोपट विचार केला होता. तो बाजूला ठेवून बारकाईने अभ्यास सुरू केला. यातून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.अक्षरशः झपाटल्यासारखे मी हे काम करीत होतो.
चित्रकूट येथील कामानिमित्त जवळपास तीन वर्षे नानाजींचा मला सहवास मिळाला. अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी चित्रकूटला जाणे व्हायचे. प्रत्येक भेटीत त्यांच्याकडून एक नवा विचार मिळायचा. वयाच्या नव्वदीत असतानाही त्यांचे विचार ऐकल्यावर थक्क व्हायचो. एकदा दिवसभराचे काम संपल्यावर मी त्यांना त्यांच्या कुटीत भेटलो व त्यांचे स्केच काढण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी होकार दिला. 26 मार्च 2005 रोजी मी त्यांचे स्केच प्रत्यक्ष काढले, त्यांना ते प्रचंड आवडले. हे स्केच आजही मी जीवापाड जपून ठेवले आहे. नानाजींच्या सान्निध्यातील हे सर्व दिवस माझ्यासाठी अक्षरशः मंतरलेले होते. राजकीय यशाच्या शिखरावर असताना सर्व ऐहिक सुखांचा त्याग करून एका विशिष्ट ध्येयाने त्यांनी आपल्या आयुष्याची संध्याकाळ वंचितांच्या जीवनात नवी पहाट आणण्यासाठी वेचली. अशा महान व्यक्तिमत्त्वाचा भारतरत्न किताबाने झालेला गौरव व या भारतरत्नासमवेत मला काम करण्याची मिळालेली संधी ही माझ्यासाठी परमभाग्याचीच गोष्ट असल्याचे मी मानतो.
[email protected]
– शब्दांकन – सचिन कलमदाणे





























































