प्रांत कार्यालयावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा व जेलभरो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । श्रीरामपूर

अंगणवाडी सेविका- मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन वेतनश्रेणी व भत्ते देण्यात यावे, केंद्र सरकारच्या २० सप्टेंबर २०१८ च्या मानधन वाढीच्या अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी करावी, सेवा समाप्ती लाभात तिप्पटीने वाढ करावी, एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे खाजगीकरण करू नये, योजनेचे बजेट दुप्पट करावे, लहान कुटुंबाचे सक्तीचे प्रतिज्ञापत्र घेण्याचे बंद करावे, यासह विविध मागण्यासाठी श्रीरामपूर, नेवासा, राहाता, राहुरी, कोपरगाव तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत नगर जिल्हा अंगणवाडी सेविका- मदतनिस कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मेनरोड-शिवाजीरोड मार्गे विविध घोषणा देत प्रांत कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. यावेळी पोलिसांनी जेलभरो करण्यास हतबलता दर्शविल्याने मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.

यावेळी मोर्च्यास मार्गदर्शन करतांना युनियनचे सरचिटणीस कॉ. राजेद्र बावके म्हणाले की, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या आदेशानुसार दि. ११,१२,१३ फेब्रुवारीला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी राज्यभर मोर्चे व जेलभरो आंदोलन जाहीर करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर मध्ये मोर्चा काढण्यात आलेला असून केंद्र व राज्य सरकारच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न निर्माण झालेले आहेत. सरकारने बजेटमध्ये केलेल्या कपातीमुळे सदरहू प्रकल्पाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तुटपुंज्या मानधनवाढ करून सरकार अंगणवाडी सेविका- मदतनिसांची पिळवणूक करत आहे. सातत्याने सेविका- मदतनिसांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असलेल्या केंद्रातील व राज्यातील सरकारला येत्या निवडणुकीत धडा शिकविण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.

यावेळी श्रमिक महासंघाचे अध्यक्ष कॉ. बाळासाहेब सुरुडे, कॉ. मदिना शेख, कॉ. जीवन सुरुडे, कॉ. शरद संसारे, इंदुबाई दुशिंग, शोभा पवार, यांची भाषणे झाली. सदर मोर्च्याचे निवेदन नायब तहसीलदार उगले यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री व महिला बाल विकास मंत्री यांना देण्यात आले.

मोर्चा यशस्वी करण्यासाठी युनियनचे सरचिटणीस कॉ. राजेंद्र बावके, श्रमिक महासंघाचे अध्यक्ष कॉ. बाळासाहेब सुरुडे, कॉ. मदिना शेख, कॉ. जीवन सुरुडे, कॉ. शरद संसारे, इंदुबाई दुशिंग, शोभा पवार, वंदना गमे, निर्मला चांदेकर, रतन गोरे, अलका दरंदले, सुनिता पवार, मंगल राऊत, मीना कुटे, अर्चना राहणे, अर्चना मावळे, मीना धाकतोडे, मंगल भाकरे, कावेरी शिंदे, मंदा दळवी, नसीमा शेख, चंद्रकला विटेकर, मंगल निधाने, भागीरथी पवार, मालन माळी, अंजना आढाव, मंदा निकम, शोभा विसपुते, सुनिता वाणी आदींनी प्रयत्न केले.