
सामना प्रतिनिधी। भूम
मागील चार वर्षापासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून यावर्षी सर्वत्र पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. काही ठिकाणी पेरण्या झाल्या तर काही ठिकाणी अजिबात पेरणी झालेली नाही. संपूर्ण भूम परांडा, वाशी विधानसभा मतदारसंघात जनावरांच्या चाऱ्याची तीव्र टंचाई जाणवत असून सर्वत्र भयाण दुष्काळी परिस्थिती आहे. खचून जाऊ नका धीर धरा ! दुष्काळ कितीही गंभीर असला तर तरी शिवसेना तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिलं असे आश्वासन शिवसेना उपनेते तथा आमदार डॉ. तानाजी सावंत यांनी शेतकऱ्यांना दिले.
शिवसेना उपनेते, आमदार डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते आज बुधवार 13 फेब्रुवारी रोजी भूम तालुक्यातील चिंचपुर ढगे येथे दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी शेतकऱ्यांना पशुखाद्याचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार सावंत यांनी दुष्काळी भागाची पाहाणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच त्यांनी शिवजलक्रांती योजनेअंतर्गत सुरु असलेल्या जलसंधारणाच्या कामाची पहाणी करुन त्या ठिकाणी जमलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या ठिकाणी जनावरांना लागणाऱ्या या पशुखाद्याचे वाटप सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना आमदार सावंत म्हणाले की, मी सध्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी फिरत असून शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे. एकूणच राज्यात जनावरांसाठी लागणाऱ्या या चाऱ्याची व पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. काही भागात पेरण्या झाल्या असल्या तरी काही भागात पेरणी झालेली नाही असे सांगून तुमच्या मनात काय आहे जे जाणून घेण्यासाठी मी आलो आहे. पाऊस पडेपर्यंत शिवसेना कोणालाही पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू देणार नाही, असे सांगून त्यांनी किती शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असा प्रश्न करुन ज्या लोकांची कर्जमाफी झाली नाही, त्या लोकांनी आपली माहिती आमच्याकडे द्यावी, आम्ही त्यांच्या कर्जमाफीसाठी प्रयत्न करु अशी ग्वाही त्यांनी दिली. शेतकरी हा गुन्हेगार नाही, त्यामुळे माफी असा प्रकार नाही, तेव्हा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती देण्यात आली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
परिस्थिती गंभीर आहे, तेव्हा अशा परिस्थितीवर आपण मात करायला शिकले पाहिजे, या परिस्थितीत आपले बरे-वाईट करुन घेण्याचा विचार अजिबात करु नका, ज्यावेळी मदतीची गरज पडेल. त्यावेळी शिवसेनेची आठवण करा, शिवसेना तुम्हाला स्थानिकचे पदाधिकारी, शिवसैनिक शेतकऱ्यांना मदत करेल असे ते म्हणाले.
यावेळी जिल्हा प्रमुख गौतम लटके, जिल्हा समन्वयक दत्ता साळुंके, जिल्हा संघटक मेघराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत, उपजिल्हाप्रमूख दत्तात्रय मोहिते, जिल्हा युवा अधिकारी चेतन बोराडे, भूम तालुकाप्रमूख सुरेश कांबळे, परांडा तालुकाप्रमुख आण्णासाहेब जाधव, वाशी तालुकाप्रमूख अॅड. सत्यवान गपाट, युवसेना तालुका आधिकारी निलेश चव्हाण, युवा सेना परांडा तालुका आधिकारी राहूल डोके, युवासेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

































































