शिवसेना भाजप युतीची घोषणा; कोण किती जागा लढणार, वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uddhav-thackrey-and-amit-sh
फाईल फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

अयोग्य आणि अविचारी लोकांच्या हातात सत्ता जाऊ नये, यासाठी समविचारी आणि राष्ट्रीय विचार असणाऱ्या भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. “हिंदुत्व, राममंदिर, सर्वसामान्य जनता, शेतकरी यांच्या व्यापक हिताचा विचार करून भाजपसोबत राजकीय आणि सैद्धांतिक युती केल्याचे ते म्हणाले. शिवसेना शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आग्रही आहे. तसेच जनतेचा विरोध असल्याने नाणार प्रकल्पालाही आमचा विरोध आहे. जनतेचा पाठिंबा असलेल्या ठिकाणी प्रकल्प स्थापन करण्यास आमची मान्यता आहे. आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहे.” त्यामुळे गैरसमज आणि मतभेद बाजूला सारत देशहितासाठी युती करत असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.


तसेच “काही गैरसमज आणि मतभेदांमुळे ज्या देशविरोधी शक्तींशी आम्ही लढा दिला. त्याच अविचारी आणि अयोग्य लोकांच्या हातात सत्ता जाऊ नये यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. देश आणि राज्याच्या हितासाठी काही गैरसमजांमुळे अयोग्य आणि अविचारी लोकांच्या हातात सत्ता जाऊ देणार नाही. स्थानिकांचा विरोध असल्याने नाणारमध्ये प्रकल्प नको, जनतेचा पाठिंबा असलेल्या ठिकाणी प्रकल्पाला आमची सहमती आहे.” राममंदिर ही देशाची ओळख आहे. त्यामुळे लवकरात लवकर राममंदिर निर्माण करण्यासाठी दोन्ही पक्षांचे एकमत झाल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रद्धाजंली वाहिली. शहिदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, हिंदुस्थान लेचापेचा नाही हे पाकिस्तानला लवकरच कळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


लोकसभा निवडणुकीत युती 45 जागांवर विजयी होईल असा विश्वास भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला. हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन करून त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकदिलाने, एकजुटीने काम करून विजय मिळवतील असे ते म्हणाले. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही युतीचाच विजय होणार असल्याचा विश्वासही शहा यांनी व्यक्त केला. तसेच “आमच्यात असलेले गैरसमज आणि मतभेद दूर झाले आहेत. भाजपचा शिवसेना सर्वात जुना मित्र पक्ष आहे. चांगल्या वाईट प्रसंगात शिवसेनेने भाजपला साथ दिली आहे. त्यामुळे कटू अनुभव दूर सारून आम्ही एकत्र आलो आहोत.” यापुढे कटु अनुभव आणि गैरसमज टाळण्यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना भाजप युती झाल्याची घोषणा केली. लोकसभेसाठी शिवसेना 23 तर भाजप 25 जागा लढवणार असल्याचे ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीसाठी मित्रपक्षांना काही जागा सोडून राहिलेल्या जागा दोन्ही पक्ष समानतेने वाटून घेतील. सत्तेत आल्यानंतर दोन्ही पक्ष पदे समानतेने वाटून घेतील असे त्यांनी सांगितले. सत्ता आणि पदांसाठी दोन्ही पक्षांची चर्चा नसून व्यापक जनहितासाठी युतीचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आपण वेळोवेळी सल्ला घेतो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्यात आणि देशात आमच्या सरकारने चांगले काम केले असल्याने पुन्हा रालोआच सत्तेत येणार असे ते म्हणाले. “शिवसेनेच्या सर्व मागण्यांचा आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत शिवसेनेशी सहमत असून कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देणार आहोत.” त्यासाठी तातडीने प्रक्रियेला सुरुवात करणार असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय विचारांच्या पक्षांनी एकत्र येण्याच्या जनभावनेचा दोन्ही पक्षांनी आदर केला आहे. हिंदुत्त्वाच्या विचारामुळे दोन्ही पक्ष 25 वर्षांपासून एकत्र आहेत. आमच्यात झालेले गैरसमज आम्ही दूर केले आहेत. आता लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढवणार असल्याचे ते म्हणाले.