कोकणच्या आंबा पोळीची शहरवासीयांना भुरळ!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

हापूस आंबा म्हटले की, तोंडाला लगचेच पाणी सुटते. कोकणात हापूसच्या लागवडी खालील क्षेत्र वाढत असतांना गेल्या काही वर्षात, यावर प्रक्रीया करणारे लघू उद्योग देखील उभे राहिल्याने उत्पादकांना अपेक्षित मोबदला मिळू लागला आहे. हापूस आंब्याच्या रसा पासून केली जाणारी पोळी हा अवीट गोडी आणि चवीचा प्रकार असून याची पर्यटकांसह शहरवासीयांना मोठीलागली आहे. आंबापोळीला असणारी मागणी लक्षात घेऊन कोकणातील बचत गटांसह अन्य लघू उद्योगांनी आंबा पोळीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यास सुरुवात केली असल्याची माहिती, राजापूर तालुक्यातील प्रिंदावण येथील आंबा पोळी उत्पादक ज्योती प्रकाश सप्रे यांनी दिली.

हापूस आंबा पोळीची चव लाजवाब असल्याने कोकणात पर्यटनासाठी येणारे पर्यटक ठिकठिकाणी स्टॉलवर अथवा महिला बचत गटांकडून याची खरेदी करतात. हापूस आंबा पोळी कडक आणि टिकाऊ असल्याने ती सहा महिन्यांपर्यंत कधीही वापरून चालते. पाहुणे म्हणून कोणाकडे जाणे होते त्यावेळी बिस्कीट पुड्याऐवजी आंबा पोळी नेली तर, मुलांसहीत घरातील मंडळीही आनंदीत होतात. उत्कृष्ट आंबा पोळीचा किलोचा दर ४५० ते ६०० रुपये किलो असतो. कोकणात ठिकठिकाणी आंबा पोळी ४५० ते ५०० रुपये किलो या दराने मिळत असली तरी, मुंबई – पुणे सारख्या मोठ्या शहरात हाच दर ५५० ते ६०० रुपये किलो एवढा असतो.

राजापूर तालुक्यातील प्रिंदावण सारख्या ग्रामीण भागात बीएससी ॲग्री झालेल्या प्रकाश सप्रे या आंबा बागायतदारांनी एफ पी ओ चा परवाना घेऊन हापूसच्या रसाचे टीन तयार करण्याचा उद्योग सुरु केला. त्यांना मदत म्हणून पत्नी ज्योती यांनी हापूस आंबा पोळी तयार करण्यास सुरुवात केली. निवडक आंब्यांपासून काढलेल्या रसापासून तयार केल्या जाणाऱ्या या पोळीला मागणी वाढल्यानंतर त्यांनी या उद्योगाचा विस्तार केला. आता सप्रे फुडसच्या माध्यमातून त्यांनी तयार केलेली आंबा पोळी मुंबई, पुणे या शहरात जावू लागली आहे. आंबा पोळी तयार करणे आणि त्याचा दर्जा टिकवणे हे मोठे कौशल्याचे काम असून एक बॅच तयार होण्यास एक आठवड्याचा कालावधी लागतो.

मोठ्या ट्रे मध्ये रसाचा पहिला थर पसरल्यानंतर तो उन्हामध्ये वाळवला जातो. तिसऱ्या दिवशी परत रसाचा दुसरा थर दिला जातो. पुढील दोन दिवसांनी आंबा पोळीचे एका आकारात तुकडे केले जातात. आंबा पोळीचे हे तुकडे दोन दिवस उन्हात वाळवल्यानंतर पुढील आठवड्यात त्याचे सीलबंद पॅकींग केले जाते अशी माहिती सप्रे फुडसच्या ज्योती सप्रे यांनी दिली.

दरवर्षी मागणीनुसार आंबा पोळीचे उत्पादन कमी जास्त घेतले जाते. गत काही वर्षात कोकणात बचत गटांची चळवळ जोमाने उभी राहिल्याने स्त्रियांच्या हाताला काम मिळाले आणि संसाराला हातभार लावण्यास पैसाही मिळत गेला. बचत गटांनीही भाजीपाला, पापड – लोणची एवढ्यावर न थांबता काजूगरांचे आणि आंबा पोळीचे उत्पादन घेण्यास पुढाकार घेतला असून या व्यवसायातून बचत गटांमधील स्त्रीया आर्थिक सक्षम होवू लागल्या आहेत.