धर्मादाय आयुक्त कार्यालयातील लाचखोर निरीक्षकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयामध्ये पुजापाठ करणार्‍या एका व्यक्तीकडून दहा हजार रुपयांची लाच स्विकारणार्‍या न्यास नोंदणी निरिक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. हा प्रकार न्यास नोंदणी कार्यालयाच्या परिसरातच घडला. एका पुजापाठ करणार्‍या 37 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की, धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरिक्षक गंगाधरपंत धोंडीबाराव नांदेडकर (वय 48) निरिक्षक 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करत आहेत.

पुजार्‍याचा चौकशीतील जबाब त्याच्या सांगण्याप्रमाणे घ्यावा, सोबतच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर या न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत त्या जबाबासोबत जोडून त्याच्यासाठी अनुकूल होईल असा अहवाल वरिष्ठ अधिकार्‍यांकडे पाठविण्यासाठी 15 हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर 10 हजार रुपये लाच ठरली आणि बुधवारी दुपारी धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या परिसरातच गंगाधरपंत नांदेडकर यांनी ती लाच स्विकारली. लाच स्विकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी गंगाधरपंत धोंडीबाराव नांदेडकर (47) रा.लक्ष्मीनगर यास पकडले. लाचलुचप विभागाचे पोलीस अधिक्षक संजय लाठकर, पोलीस उपअधिक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक कपील शेळके, पोलीस कर्मचारी शेख चाँद, जगन्नाथ अंतवार, एकनाथ गंगातीर, ताहेर खान आणि अनिल कदम यांनी लाचखोर नांदेडकरला अटक केली. नांदेडकरविरुध्द वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.