
>>डॉ. विजया वाड
अचला जोशी, वाईन लेडी… आपले थोरले बंधू डॉ. अजित फडके यांच्याशी असलेले आपले निखळ नाते उलगडून दाखवले आहे.
लातूरचे डॉ. अशोक कुकडे हे डॉ. अजित फडके यांच्याबद्दल जे गौरवोद्गार काढतात ते येथे उद्धृत केल्यास वाचकांना डॉ. अजित फडके यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसाच समोर धरल्यासारखे होईल. ते म्हणतात, ‘हिंदुस्थानात मूत्रपिंडरोपण शस्त्रक्रियेसाठी डॉ. अजित फडके यांचं नाव घेतलं जातं. त्यात ते अग्रणी होते. मूत्रपिंडरोपण शस्त्रक्रिया हे टीमवर्क आहे. आपल्या नेतृत्वाखाली त्यांनी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उत्तम संच उभा केला. उत्तम याचा अर्थ अनेकांगी आहे. व्यावसायिक, तंत्रज्ञान आणि शैक्षणिकदृष्टय़ा तर हे काम उत्तम होतंच, पण सामाजिक, आर्थिक आणि नैतिकदृष्टय़ाही डॉ. फडके यांचं काम सर्व कसोटय़ांना उतरणारं होतं.
प्रिय वाचकांनो, एक ख्यातनाम डॉक्टर दुसऱया डॉक्टरचे गुण गात आहे. यातच डॉ. अजित फडके यांचे यश निर्विवाद सामावले आहे. ख्यातनाम ‘वाईन लेडी’ अचला जोशी ही डॉ. अजित फडके यांची सख्खी धाकटी बहीण. तिने चितारलेला डॉ. अजित फडके यांचा जीवनपट म्हणजे हे सर्वांगसुंदर पुस्तक ‘चंद्रमे जे अलांछन’.
अचला जोशीचे तिच्या भावाबरोबर नाते निखळ मैत्रीचे होते. अजोड स्नेह, प्रेम या धाग्यांनी विणलेले होते. आपलं माणूस जेव्हा प्रॉस्टेटच्या कॅन्सरने आजारी पडतं, तेव्हा अचानक वेळ मौल्यवान होतो. शक्य तेवढा वेळ या अगदी जीवाच्या माणसासोबत काढावा अशी इच्छा होते. भविष्याबद्दल बोलण्यासारखं काही उरत नाही तेव्हा भूतकाळातल्या रम्य आठवणींचा खजिना आपण उघडतो. अचलाताईंनी आपल्या प्रिय भाऊरायासंगे हेच केलं.
कधी वर्तमान काळातल्या राजकारणावर, विज्ञानाच्या रुंदावलेल्या कक्षांबद्दल, तर कधी चालू असलेल्या नाटक-सिनेमाबद्दल बहीण-भाऊ बोलत. डॉ. अजित यांची व्यक्ती आणि घटनांबाबतची स्वतःची अशी ठाम मतं होती. काळानुसार त्यांची रचना करू नि हे शब्दाविष्कार थोडय़ा प्रती काढून नातेवाईंकात वाटू असा विचार बहीण अचलाच्या मनात होता. डॉ. गंगाधर फडके आणि मनोरमा फडके यांची ही मुलं अजित आणि अचला. एका कनवाळू आणि तत्त्वनिष्ठ पित्यानं आणि अत्यंत सुसंस्कृत मातेनं केलेल्या माणुसकीच्या संस्कारामुळे त्यांच्या मुलानं अनेक अभागी जीवांची आयुष्यं आपल्या संजीवक स्पर्शानं कशी उजळून टाकली ते सांगणारी ही कथा आहे.
डॉक्टरांच्या बाबांनी उभारलेलं कॉलनी हॉस्पिटल डॉ. अजित फडके यांनी आयुष्यभर सांभाळलं ते बाबांची तत्त्वं जपत. श्रीमंतांसाठी पंचतारांकीत इस्पितळं पायघडय़ा अंथरून असतात. गरीबांसाठी केईएम, जेजेसारखी रुग्णालये आहेत, पण मध्यमवर्गीय लोकांना हवी तशी सेवा देता यावी म्हणून डॉ. गंगाधर फडके कॉलनी इस्पितळ चालवीत. ही प्रॅक्टीस पैशांपाठी लागून केलेली प्रॅक्टीस नव्हती, तर तो मानवसेवेचा वसा होता, जो पुत्राने पित्याकडून उचलला.
या पुस्तकात पृ. क्र. 174-175वर ‘व्हीआयपी’ सिंड्रोमच्या ऑपरेशनचा अतिशय रोचक किस्सा आहे. असाच एक वयोवृद्ध व्हीआयपी टाटा थिएटरमध्ये ऑपरेशनसाठी दिल्लीहून आलेला. गुरूवर्य डॉ. पेमास्टर आणि डॉ. मेहरूमजी तेथे जातीने हजर होते. ऑपरेशनच्या वेळी टाटा मेमोरियलमधले सर्व वरिष्ठ डॉक्टर थिएटरमध्ये हजर झाले. प्रोस्टेटची गाठ प्रमुख डॉक्टरांनी सफाईने काढली, पण त्या निर्माण झालेल्या पोकळीत रक्तस्राव व्हायला लागला. डॉक्टर पॅक देत राहिले. ऑपरेशन संपत आले. ते डॉक्टर पेमास्टरांना म्हणाले, ‘आता अजित फडके हे पूर्ण करतील. मला केईएमच्या डीनला भेटायचं आहे. ते पूर्ण करतो.’ डॉ. फडक्यांनी ऑपरेशन पूर्ण केलं. युरोलॉजीवर दुसऱ्या दिवशी खंडाळ्याला एक अतिविशेष परिषद होती, पण डॉ. अजित फडके परिषदेला गेले नाहीत. कारण हा अतिरक्तस्राव झालेला पेशंट. त्याचा जीव महत्त्वाचा होता. अन् खरेच दुसऱ्या दिवशी परत ऑपरेशन करावे लागले. देवाची कृपा! पेशंट वाचला. परतताना किती वेळ अजितसरांचा हात हाती घेऊन बसला होता. अजित टाटा हॉस्पिटलच्या लांबलचक कॅरिडॉरमधून परतत होते आणि काही वर्षांपूर्वी त्यांना सर्जरीचे धडे देणारे द्रोणाचार्य-भीष्माचार्य योग्यतेचे पेमास्टर आणि मेहरूमजी अक्षरशः डोळे पुसत त्यांच्या दोन्ही बाजूंनी चालत होते. कोणाही विद्यार्थ्याचा याहून मोठा सन्मान कोणता असणार?
डॉ. अजित फडके यांच्याबद्दल मित्र, नातेवाईक, शेजारी, मदतनीस काय म्हणतात ते वाचून डॉक्टरांचे ‘बिलोरी’ दर्शन वाचकांना घडते. अचलाताई वाचकांची नुसती मने जिंकत नाहीत, तर वाचकांच्या दिलावर त्या राज्य करतात. मौज प्रकाशनाने उत्तम छपाई, अचूक छायाचित्रे यांनी पुस्तक सुंदर प्रकारे वाचकांच्या हाती दिले आहे. सतीश भावसार यांचे मुखपृष्ठ अर्थवाही नि सुरेख आहे. वाचकांनी, विशेषतः तरुण वैद्यकीय व्यावसायिकांनी हे पुस्तक जरूर वाचावे. संस्कार, संस्कृती, सभ्यता यावर ज्यांचे जीवन आधारले, तो हा हिंदुस्थानी डॉक्टर त्यांना जीवनभराची प्रेरणा देईल.
चंद्रमे जे अलांछन
प्रकाशक – मौज प्रकाशन
लेखिका – अचला जोशी
पृष्ठ – 447 किंमत – 500 रु.





























































