
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानशी क्रीडा संबंध ठेवू नयेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. हिंदुस्थानच्या माजी क्रिकेटपटूंकडूनही पाकिस्तानविरुद्ध आक्रमक बाणा दाखवण्यात आला आहे. हिंदुस्थानचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आवाहन करताना म्हटले की, पुलवामा येथे हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना संयुक्त राष्ट्राकडे सोपवा! वर्ल्ड कपमधला पाकिस्तानविरुद्धचा सामना हिंदुस्थानी संघ खेळला नाही तर दोन गुण कोणाला मिळणार? पाकिस्तानला. हिंदुस्थानी संघ वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध एकाही लढतीत पराभूत झालेला नाही. त्यामुळे आपल्या हक्काच्या गुणांवर पाणी सोडावे लागणार आहे. मात्र केंद्र सरकारने जर पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला तर मी त्यांच्यासोबत असेन. पण आयत्या गुणांवर पाकिस्तानने वर्ल्ड कपमध्ये आगेकूच करता कामा नये, असे सुनील गावसकर या वेळी म्हणाले.




























































