
सामना प्रतिनिधी । बुलढाणा
महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने 7 व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे शेगाव येथे उद्या शनिवारी आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनाचा बहुमान अमरावती विभागाला मिळाला आहे. संघटनेच्या जिल्हा शाखेने अधिवेशनाची जबाबदारी स्वीकारली आहे.
सकाळी 9 ते 11 सदस्य नोंदणी त्यानंतर उद्घाटन सोहळा, स्मरणिका प्रकाशन, मान्यवरांची मनोगते, दुपारी 2 ते 5 संघटनेच्या कामाचा लेखाजोखा, अडचणी, समस्यांवर खुली चर्चा होणार आहे. संघटनेचे सक्रीय पदाधिकारी व बुलढाणा तहसीलदार सुरेश बगळे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील पदाधिकारी आयोजनासाठी परिश्रम घेत आहे. अमरावती विभागीय अध्यक्ष प्रवीण ठाकरे, सचिव संजय खडसे, सहसचिव संजय गरकळ यांचे नेतृत्वात विभागातील पदाधिकारी, सभासद व तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी यासाठी भरीव योगदान दिले आहे. या अधिवेशनाला प्रमुख मार्गदर्शन म्हणून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, प्रमुख अतिथी म्हणून महसूल राज्यमंत्री संजय राठोड, बुलढाणाचे पालकमंत्री मदन येरावार, अमरावतीचे पालकमंत्री प्रविण पोटे, अकोल्याचे पालकमंत्री रणजित पाटील उपस्थित राहणार आहे. यावेळी महसूल वनविभागाचे अवर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, विभागीय आयुक्त पीयुष सिंह, संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजनकांनी केले आहे.
































































