व्यंगचित्रकलेचा प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संजय मिस्त्री

जगभरात व्यंगचित्र आणि व्यंगचित्रकारांना मानाचे स्थान आहे. पाहताक्षणी हसवणारे आणि त्याचबरोबर उपरोधिक मार्मिक भाष्य करणारे व्यंगचित्र वाचकांची दिलखुलास दाद मिळवून जाते. व्यंगचित्रे जशी करमणूक करतात तशीच अंतर्मुखही करतात. म्हणूनच या कलेचे महत्त्व सर्व माध्यमांत अबाधित आहे.

व्यंगचित्रकलेला खूप जुनी परंपरा आहे. ब्रिटिश हिंदुस्थानात येताना अनेक गोष्टी घेऊन आले. क्रिकेट, व्यंगचित्रकला ही त्यापैकीच. ब्रिटनमध्ये त्या वेळी ‘पंच’ नावाचे नियतकालिक चालू झाले होते. व्यंगचित्रे आणि काही विनोदी लेख असे त्याचे स्वरूप. त्यात फिल मे, टेनियल हे व्यंगचित्रकार व्यंगचित्रे काढीत. या ‘पंच’ मासिकाची नक्कल जगभर झाली. हिंदुस्थानात फारसी पंच, हिंदू पंच निघाले. ‘मार्मिक’ साप्ताहिकाचे जे स्वरूप आहे साधारण तसेच ते होते. भरपूर व्यंगचित्रे आणि काही विनोदी लेख.

हळूहळू व्यंगचित्रकला हिंदुस्थानात लोकप्रिय होऊ लागली. त्यातून ‘शंकर्स विकली’चे शंकर पिल्ले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आर. के. लक्ष्मण असे जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार तयार झाले. या व्यंगचित्रकारांवर डेव्हिड लो या मूळच्या न्यूझिलंडच्या व नंतर ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या व्यंगचित्रकाराचा प्रभाव होता. तसा महाराष्ट्रातील असंख्य व्यंगचित्रकारांवर एका असामान्य व्यंगचित्रकारांच्या फटकाऱयांचा प्रचंड प्रभाव आहे, तो प्रभाव म्हणजे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रे.

‘मार्मिक’ साप्ताहिकावरील त्यांची व्यंगचित्रे पाहता पाहता व्यंगचित्रकारांची पिढी तयार झाली. त्या वेळी करमणुकीची साधने मर्यादित होती. रेडिओ, टी.व्ही., टी.व्ही.वरही एकच चॅनेल. त्यामुळे वाचनाची आवड टिकून होती. दैनिकांच्या पुरवण्या, वेगवेगळी विचारांची मेजवानी देणारी साप्ताहिके, मासिके वाचकांमध्ये कला साहित्याची आवड निर्माण करीत. त्यानंतर मोबाईल, त्यामध्ये व्हॉट्सऍप, फेसबूक, इन्स्टाग्राम असे ऍप प्रकार आले आणि तरुण पिढी भरकटल्यासारखी झाली. कला साहित्याकडे पाहायला वेळ नाही असे झाले. सारखे व्हॉटस्ऍप, फेसबुक, इन्स्टाग्राममध्ये मग्न राहणे त्यांचे जीवन झाले. कानाला इअरफोन लावून तारस्वरातील कर्कश गाणी ऐकणं म्हणजे रसिकता झाली. आणि त्याचा परिणाम सगळय़ा कलाप्रकारांवर झाला. प्रत्येक कला उथळ स्वरूपात लोकांसमोर यायला लागली. आर्थिक गणिते बदलली. बहुतांशी जाहिराती टीव्हीकडे वळल्यामुळे वर्तमानपत्रातील जाहिराती कमी झाल्या. त्यामुळे आलेल्या जाहिरातींना प्राधान्य देण्याच्या नादात पहिल्या पानावरचे पॉकेट कार्टून आतल्या पानात केव्हा उडून गेले कळले नाही.

परत झालं असं, वर्तमानपत्राचं उत्पन्नाचं जाहिरातस्रोत कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम व्यंगचित्रकारांच्या मानधनावर झाला. त्यामुळे व्यंगचित्रकलेची आवड असणारे भरपूर पैसे देणाऱया व्यंगचित्रमय ऑनिमेशन क्षेत्राकडे वळले. कार्टून्सचे वेगवेगळे चॅनेल्स व त्यातून दिसणाऱया व्यंगचित्र मालिकांसाठी अधिकाधिक कुशल ऑनिमेटर्सची गरज भासू लागली. त्यासाठी भरपूर वेळ, पैसा खर्च करावा लागतो. त्यामुळे नवीन पिढी त्या जुन्या वर्तमानपत्रातील, तुलनेने कमी मानधन देणाऱया क्षेत्राकडे वळेनाशी झाली व हळूहळू वर्तमानपत्रांतील पहिल्या पानावरील व्यंगचित्रांची जागा ओस पडू लागली. वर्तमानपत्रे आर्थिक गणित पाहू लागली. पैसे वाचावेत किंवा चांगली व्यंगचित्रे मिळत नाहीत या कारणासाठी व्यंगचित्रे छापणे बंद केले. परत झाले असे की, जुन्या व्यंगचित्रकारांसमोर पूर्वीसारखी आदर्श व्यंगचित्रे नसल्यामुळे चांगले व्यंगचित्रकार तयार झाले नाहीत. त्यामुळे मधल्या फळीतील व्यंगचित्रकारच चांगले काम करताना दिसतात.

व्यंगचित्रकलेसाठी लागणारे चांगले आदर्श, साधना, पूर्ण वेळ व्यंगचित्रकार होण्यासाठी नोकरी न करता झोकून देण्याच्या तयारीचा अभाव, अभ्यासाची वानवा यामुळे ज्यांनी या क्षेत्रात झोकून दिले तेच दर्जेदार काम करताना, व्यंगचित्रे काढताना दिसू लागले. तर बाकीचे नातेवाईक, मित्रांच्या ‘लाइक्स’ने हुरळून जाऊ लागले. अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाखाली रेघोटय़ा ओढताना दिसू लागले. व्हॉटस्ऍप, फेसबुकवरून पाठवू लागले. त्यांना या ‘लाईक्स’मुळे आपण महान व्यंगचित्रकार झाल्याचा भास होऊ लागला. तिथेच कलासाधना, व्यासंग, मेहनत, अभ्यास या गोष्टीला ओहोटी लागली.

पूर्वीच्या व्यंगचित्रकारांवर जसा चांगल्या व्यंगचित्रकारांचा प्रभाव होता तसा संपादकांचाही होता. संपादकही व्यंगचित्रकलेचे जाणकार होते. त्यामुळे त्यांच्या त्या व्यंगचित्रकाराच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असे. गेल्या काही वर्षांत फास्ट आणि इन्स्टंट मिळू लागल्यामुळे, म्हणजे इंटरनेटवरून चांगली तयार व्यंगचित्रे, अर्कचित्रे मिळू लागल्यामुळे पैसे देऊन पाहिजे तशी व्यंगचित्रे काढून घेण्याकडचा कल कमी झाला. पैसे पुरेसे मिळत नसल्यामुळे या क्षेत्रात नवीन पिढीने फिरकणे सोडले. त्यामुळे नियतकालिकांनाही रेडिमेड व्यंगचित्रांची मदत घ्यावी लागते. आजही जाणकार संपादक व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रे आवर्जून छापतात.

योग्य मार्गदर्शनाचा अभाव असल्याचे लक्षात आल्यामुळे विकास सबनीस व मी व्यंगचित्रकला कार्यशाळा चालू केल्या. मुंबईत दादरला शिवाजी पार्क येथे हे वर्ग चालतात. त्याला आवड असणाऱया विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो. व्यावसायिक, पूर्ण वेळ व्यंगचित्रकारांचे मार्गदर्शन, त्यांच्या अनुभवाचा लाभ मिळाल्यामुळे निखिल मुळय़े, निखिल गायकवाडसारख्या आमच्या विद्यार्थ्यांनी अनेक बक्षिसे वारंवार मिळविली आहेत. व्यंगचित्रांची सखोल जाण नसल्यामुळे उथळ व्यंगचित्रे निर्माण होतात. हा उथळपणा, जाण नसणे, व्यंगचित्रकला रसिकतेबाबत, विनोदबुद्धीबाबत झाला आहे.

त्यामुळेच अनेक राजकारणी व्यंगचित्रकारांवर, वर्तमानपत्रांवर हल्ले करताना दिसतात. वाढते तणाव, प्रचंड स्पर्धा, वेळेचे व्यवस्थापन नसणे, व्यक्तींबद्दलचा अनादर, सोशल मीडिया या प्रभावी माध्यमाचा चांगल्या कामासाठी वापर करण्याऐवजी दुरुपयोग करणे, या सगळ्या कारणांमुळे समाजातील विनोदबुद्धी कमी होत चालली आहे. विनोदबुद्धी हे तणाव दूर करणारी, मन प्रसन्न करणारी अद्भुत चीज आहे. पण प्रत्येक जण हल्ली तणावाखाली असल्यामुळे छोटय़ा कारणांवरून चिडचिड, राग, संताप, उद्रेक हे वाढू लागलेत. त्याचाच परिणाम व्यंगचित्रकलेच्या रसिकतेवर झालाय.

बाळासाहेब ठाकरेंच्या प्रत्येक भाषणांतून व्यंगचित्रकार डोकावायचा, हास्याचे फवारे उडायचे, प्रचंड सभा असली तरी त्या जगप्रसिद्ध व्यंगचित्रकाराच्या वक्तृत्वाने वातावरण हलके फुलके असायचे. आताची नेत्यांची एकमेकांची उणी-दुणी काढणारी, आक्रमक भाषणे समाजमन प्रदूषित करतात. त्यामुळे व्यंगचित्रकलेचा आस्वाद घेण्याऐवजी आपल्या मताच्या विरुद्ध व्यंगचित्रे काढणाऱया व्यंगचित्रकाराचा दुस्वास करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. त्यामुळेच फ्रान्समधील ‘चार्ली हेब्दो’ या व्यंगचित्रनियतकालिकावर हल्ले झाले. काही वर्षांपूर्वी दक्षिणेत आनंद विकटन’मधील व्यंगचित्रकाराला तुरुंगाची हवा खावी लागली. ममता बॅनर्जीनीही व्यंगचित्रकाराला तुरुंगात बंद केले. व्यंगचित्रांमुळे जाळपोळ, दगडफेक झाली. समाजात या वाढत्या ताणतणावात व्यंगचित्रांची जास्तीत जास्त गरज आहे. ताणतणावांची आग पाण्याप्रमाणे विझविण्याचे सामर्थ्य व्यंगचित्रकलेत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात लोकप्रिय केलेल्या या ‘मार्मिक’कलेचा प्रसार जास्तीत जास्त व्हायला हवा.

– [email protected]