
सामना प्रतिनिधी, मुंबई
देशभरात 2010पासून आलिशान आणि लक्झरी घरांची मागणी कमी झाली आहे. मोठी आणि आलिशान घरे बांधली जातात. मात्र बाजारभावाप्रमाणे त्यांची विक्री होत नाही. त्यांची मागणीही कमी होत गेली असल्यामुळे आता देशभरात मध्यम आणि परवडणाऱ्या घरांची संख्या 15 ते 17 टक्क्यांनी वाढली आहे. देशाची राजधानी असलेल्या मुंबईतील घरांचा आकारही कमी झाला असल्यामुळे येत्या काळात मुंबईतही घर घेणे सर्वसामान्यांना शक्य होणार आहे.
मोठी घरे जास्त फायदा ही मानसिकता बदलत आहे
गेली अनेक वर्षे बिल्डर मोठी घरे म्हणजे जास्त फायदा अशा मनोवृत्तीमुळे बनवण्याच्या नादात आपली कोटय़वधींची गुंतवणूक बांधकाम व्यवसायात ओतत असतात. मात्र गेल्या काही वर्षांत अनेक शहरांमध्ये मोठी घरे विक्रीविना पडलेली आहेत. त्यामुळे बिल्डर आणि या क्षेत्राशी संबंधित अनेकांना तोटा सहन करावा लागतो. 2010पासून बांधकाम क्षेत्रात बदलाचे वारे वाहू लागले असून बांधकाम व्यावसायिकांनी परवडणाऱया घरांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. मोठी घरे जास्त फायदा ही मानसिकता आता बदलत आहे.
नाईट फ्रँक इंडियाने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. जगभरातील शहरी नागरिकांना घर ही सर्वांना भेडसवणारी समस्या आहे. हिंदुस्थानातही ही समस्या आहे. मात्र आता यात सुधारणा होत आहे. घरांचा आकार कमी झाला तर सर्वसामान्यांच्या आवाक्यात अधिकाधिक घरे येणार आहेत.
मुंबईसह एनसीआर (दिल्ली), बंगळुरू, पुणे, चेन्नई, कोलकाता येथे घरांचा आकार कमी होऊ लागला आहे.
मुंबईत 25 टक्के, पुण्यात 24 टक्के तर बंगळुरूत 18 टक्क्यांनी घरांचा आकार कमी झाला आहे. मात्र हैदराबाद आणि अहमदाबाद येथे आलिशान घरे बांधली जात आहेत.
घरांचा आकार कमी झाल्यामुळे बिल्डरला घरे बांधणे आणि विकणे सोपे होत आहे.
2018मध्ये परवडणाऱ्या घरांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे.


























































