आधारकार्ड देऊनही पॉस मशिनवर रजिस्ट्रेशन नाही, शिधा पत्रिकाधारक मेटाकुटीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, कुडाळ

अनेकवेळा आधारकार्ड देवूनही त्याचे पॉस मशिनवर रजिस्ट्रेशन होत नसल्याने अनेक शिधा पत्रिकाधारक मेटाकुटीला आले आहेत. प्रत्येक गावात असे सुमारे पाच टक्के ग्राहक आहेत. या रजिस्ट्रेशन पद्धतीमुळे धान्य ग्राहक व दुकानदार यांच्यात वादंग निर्माण होत असून हे वाद विकोपालाही जात आहेत. याबाबत पुरवठा विभागाने तातडीने उपाययोजना कारावी अशी मागणी दुकानदार व ग्राहक यांच्याकडून होत आहे.

पॉस मशिनवर अंगठा लावल्याशिवाय धान्य मिळणार नाही. या शासनाच्या पुरवठा विभागाच्या भूमिकेचा काही ग्राहकांना चांगलाच फटका बसू लागला आहे. ई-पॉस मशिनवर आधारकार्ड नंबरचे रजिस्ट्रेशन झालेल्या ग्राहकांनाच धान्य वितरण करावे अशा सूचना पुरवठा विभागाकडून धान्य दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक कुटुंबांना आधार कार्ड रजिस्ट्रेशन झालेल्या व्यक्तींनाच धान्य आणण्यासाठी रेशनिंग दुकानावर जावे लागत आहे.

बर्‍याच गावांत सुमारे 95 टक्क्यांहून अधिक ग्राहकांची आधारकार्ड रजिस्ट्रेशन पूर्ण झाले आहे. रेशनिंग धान्य दुकानदारांनी हे काम बर्‍याच प्रमाणात मार्गी लावले आहे. मात्र शासनाच्या या प्रणालीतील दोष युक्त घटकांमुळे काही लाभार्थ्यांचे धान्य शिल्लक राहिले आहे. काही ग्राहकांनी अनेक वेळा आपल्या आधारकार्डची झेरॉक्स रेशनिंग धान्य दुकानावर जमा केली. मात्र तरीही रजिस्ट्रेशन न झाल्याने थेट पुरवठा विभागात या झेरॉक्स जमा करण्यात आल्या मात्र तरीही आधारकार्ड नंबर या ई-पॉस मशिनला रजिस्ट्रेशन होत नसल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे या ग्राहकांचे आधारकार्ड नंबर केवायसी पध्दतीने स्थानिक स्तरावर रजिस्ट्रेशन केल्यास तुमचा नंबर या आधीच रजिस्ट्रेशन करण्यात आला आहे. अशी संदिग्ध माहिती या मशिनवर देण्यात येत आहे. असे काही ग्राहकांचे गेल्या सहा महिन्यांपासून होत आहे.

त्यामुळे प्रत्येक महिन्यात ग्राहक व धान्य दुकानदार यांच्यात वादाची स्थिती निर्माण होत आहे. सहा महिने आधारकार्ड नंबर देऊनही त्यांचे रजिस्ट्रेशन होत नसल्याने ग्राहकही आता भडकले आहेत. हे ग्राहक थेट पुरवठा विभागाशी संपर्क साधत आहेत. या प्रकारात धान्य दुकानांवर उर्वरित ग्राहकांचाही खोळंबा होत आहे. त्यामुळे येथील वादग्रस्त झालेली स्थिती हाताळताना धान्य दुकानदार चांगलेच मेटाकुटीला आले आहेत. शासनाने या प्रणालीतील तांत्रिक दोषांचा फटका ग्राहकांना बसत आहे. शासनाने लोकांच्या सुविधांसाठी राबविलेल्या या सुविधेतील तांत्रिक अडचणी दूर करून दोषमुक्त यंत्रणा लोकांसाठी कार्यान्वित करावी अशी मागणी ग्राहक वर्गातून होत आहे.