अस्वलाच्या हल्ल्यात एक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। किनवट

उन्हाळ्याची चाहूल लागल्यानंतर पाण्याचे जंगली स्त्रोत कमी झाल्याने जंगली श्वापदं आता गावालगतच्या शेतीकडे वळले आहेत. यातूनच अनेक हिंस्र पशूंचे हल्ले वाढले आहेत. सोमवारी किनवट-माहूर रस्त्यावरील शेतात कमठाला येथील सतीश अनुरथ सूर्यवंशी (३५) यांच्यावर अस्वलाने प्राणघातक हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.

किनवटपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कमठाला येथील सतीश अनुरथ सूर्यवंशी (३५) हे सोमवारी सकाळी सव्वासहा वाजता आपल्या शेतात गेले असता दडून बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्याच्या जोराच्या किंकाळण्याने शेजारच्या शेतातून उमाकांत कहाळे, सदाशिव भरकड, देवानंद भोयर, भास्कर कहाळे, नंदकिशोर पतंगे, विशाल सूर्यवंशी, सागर सूर्यवंशी यांनी जोराचा आरडा-ओरडा करत हाती मिळेल ते लाकडी दांडे घेत त्या ठिकाणी धाव घेतली. तेव्हा मात्र तो अस्वल धूम ठोकून जंगलात पळाला. तातडीने जखमी सतीशला उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला जिल्हा रुग्णालयांमध्ये हलवले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीची मदत यावेळी त्यांना दिली.