
सामना प्रतिनिधी। येवला
शहराला पाणीपुरवठा करणारा साठवण तलाव संपूर्णपणे कोरडाठाक पडल्याने शहरावर पुन्हा एकदा भीषण पाणीटंचाईचे संकट घोंगावू लागले आहे. पालिकेने स्वमालकीच्या दोन विहिरींसह बोअरवेल्स व एक विहीर पाणीपुरवठय़ासाठी ताब्यात घेतल्या आहेत. पालखेडच्या पाणी आवर्तनाकडे आता शहरवासीयांच्या नजरा लागल्या आहेत.
शहराला तीन आठवडय़ांपासून पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. पालखेडचे पाणी आवर्तन 1 किंवा 15 मार्चच्या दरम्यान मिळण्याची शक्यता सध्या प्रशासनाकडून वर्तविली जात असली तरी अद्याप यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट शहरासह तालुक्यावरही कायम आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱया साठवण तलाव परिसरातील खासगी विहिरीवरून ग्रामीण भागातील टंचाईग्रस्त गावांना शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात असून यामुळे मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा उपसा होत आहे. पण आता पाणीच नसल्याने टँकर भरणे जिकिरीचे झाले आहे.
पालिका प्रशासन पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी सज्ज असून सध्या साठवण तलावात मृत साठय़ातील पाण्यावर गरज भागवली जात आहे. दरम्यान, पालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी जिल्हाधिकाऱयांकडे पाणी सोडण्यासाठी विनंती केली आहे. शहराची टंचाईची परिस्थिती विचारात घेता आवर्तन सोडणे आवश्यक असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱयांनी पालिकेला पत्र देऊन 1 मार्चला पाणी सोडले जाईल असे कळविल्याचे पाणी पुरवठा विभागप्रमुख एस. एस. फागनेकर यांनी सांगितले.
शहराला पाच दिवसांआड पाणीपुरवठा
शहराचा पाणीपुरवठा पाण्याअभावी विस्कळीत झाला आहे. पालखेडचे पाणी आवर्तन वेळेवर न मिळाल्यास दोन वर्षांपूर्वीसारखीच शहराला टँकरने पाणीपुरवठय़ाची वेळ येणार आहे. आजूबाजूच्या विहिरीतून होणारा वारेमाप उपसा, तलावातून झिरपणारे पाणी आणि बाष्पीभवन या कारणांमुळे तलाव झपाटय़ाने आटत असल्याची वर्षानुवर्षाची स्थिती आहे. आताही तेच झाले असून यामुळे 30 जानेवारीपासून शहराला चार दिवसांआड तर 5 फेब्रुवारीपासून पाच दिवसांआड पुरवठा केला जात आहे. साठवण तलाव कोरडाठाक झाल्याने भीषण पाणीटंचाईचे संकट शहरवासीयांसमोर उभे ठाकले आहे.

































































