श्री शिवकवच स्तोत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मीना आंबेरकर  

शिवकवच. अत्यंत प्रभावी शिवस्तोत्र. संकटसमयी, कमकुवत प्रसंगी आपल्या मनाला कणखर, खंबीर करण्याचे काम शिवकवच स्तोत्र करते. हे रोज वाचावे. वाचा शुद्ध होते. मनास उभारी मिळते. येऊ घातलेल्या महाशिवरात्रीनिमित्त सोपी सुलभ शिव उपासना!!

स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील श्री शिवकवच हे शिवभक्तांचे अतिशय आवडते स्तोत्र आहे. त्याच्या नावातच त्याचे माहात्म्य जाणवते. हे नुसते स्तोत्र नसून शिवभक्तांच्या संरक्षणासाठी निर्माण केलेले ते सुरक्षा कवच आहे अशी मान्यता आहे. त्यादृष्टीने हे एक प्रभावी स्तोत्र आहे.

अतिप्राचीन काळी भद्रायू नावाच्या राजपुत्राला ऋषभ योगी नावाच्या योगी पुरुषाने हे शिवकवच सांगितले. स्कंदपुराणात सूताने ते शौनकाला सांगितले. त्यामुळे ते मानवाला उपलब्ध झाले. या स्तोत्रात शिवस्तुती तर आहेच तसेच बीजमंत्र, न्यास, ध्यान शिवरक्षा व शिवमहात्म्य वर्णन केले आहे. त्यात शिवाची वेगवेगळी नावे व शेवटी फलश्रुती सांगितलेली आहे. अनुष्टभ छंदातील शिवस्तोत्र श्रीगणेशाला नमस्कार करून श्री सदाशिव रुद्र ही देवता असून ‘र्‍हीं शक्ती रं कीलकं यं श्रीं र्‍हीं क्लीं’ हा बीजमंत्र आहे. या स्तोत्र मंत्राचा ऋषी ब्रह्मदेव आहे.

अस्य श्री शिवकवच स्तोत्र मंत्रस्य ब्रह्मा ऋषिः।

अनुष्टुभ छंदः। श्री सदाशिवरुद्रो देवता।

र्‍हीं शक्ति रं किलकम। श्रीं र्‍हीं क्लीं बीजम्

श्री सदाशिव प्रीत्यर्थे शिवकवच स्तोत्र जपे विनियोगः।।

शरीरात वास करणार्‍या सुप्त शक्ती जागृत करण्याचे सामर्थ्य या बीजमंत्रात आहे.

न्यास करताना मंत्रांनी मनःचक्षूने हात, हृदय इत्यादी अवयव देवतेच्या ठिकाणी स्थापन करावेत.

अथ न्यासः।

ॐ नमो भगवते ज्वलज्वाला मालिने।

ॐ र्‍हां सर्वशक्तिधाम्ने ईशानात्मने अंगुष्टाभ्यां नमः।

ॐ नमो भगवते ज्वलज्वाला मालिने।

ॐ नं रिं नित्यतृप्तिधाम्ने तत्पुरुषात्मने तर्जनीभ्यां नमः।।

अर्थ : सुरुवातीला न्यास करतो. तेजस्वी ज्वालाची माला धारण करणार्‍या ॐ भगवानाला नमस्कार. ॐ र्‍हां सर्वशक्तीचे आश्रयस्थान असलेल्या ईश्वराला माझ्या अंगठय़ांनी नमस्कार करतो. तेजस्वी माला धारण करणार्‍या भगवानाला नमस्कार. ॐ नं रिं नित्य संतुष्ट वृत्तीचे स्थान अशा त्या अंगठ्याच्या जवळच्या बोटांनी नमस्कार असो.

अशा रितीने न्यास संपन्न होतो. नंतर देवतेला मंत्राद्वारे योग्य विशेषणाने विनवून आपापल्या अंगप्रत्यंगाचे दशदिशांत सर्वत्र सर्व कार्य, सर्व काळी सर्व आपत्ती, भय व पीडांपासून रक्षण करण्याची प्रार्थना केली आहे.

वज्रदंष्ट त्रिनयनं कालकंठ मरिदयम्। सहस्र करंत्युग्रं वंदे शंभुंमापतिम्।।1।।

अशा रीतीने सुरुवात करून

हृत्पुण्डरीकांतरसनिविष्टं स्वतेजसा व्याप्त नभोवकाशम्।

अतींद्रियं सुक्ष्मअनंतमाद्यं ध्यायेत्परानंदमयं महेशम्।

(हृदयकमलात राहणार्‍या स्वतःच्या तेजाने अंतराळाला व्यापून राहिलेल्या इंद्रियांच्या पलीकडील सूक्ष्म व अनंत अशा अतिशय आनंदमयी महेशाचे प्रथम ध्यान करावे.) असे हे ध्यान शिवगुणांनी युक्त आहे.

नंतर देवतेच्या नामावलीच्या पठणाने देवतेची आराधना केली आहे. उदा.-

माणिक्य भूषणाय, सृष्टिस्थितिप्रलय कालरौद्रावताराय

दशध्वर विध्वंसकाय महाकालभेदनाय

मूलाधारैकनिलयाय तत्त्वातीताय गंगाधराय

सर्वदेवाधिदेवाय षडाश्रयाय सकलवेदांत साराय

त्रिवर्गसाधनाय अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय  

अर्थ : माणिकभूषणे धारण करणारा, सृष्टीच्या प्रलयकाळी रौद्रावतार घेणारा, दक्षाच्या यज्ञाचा विद्ध्वंस करणारा, मोठ्या काळाचा भेद करणारा, मूलाधारचक्री निवास करणारा, तत्त्वापलीकडे असलेला, गंगा धारण करणारा, सर्व देवाधिदेव असलेला, सहा शास्त्र्ाs जाणणारा सर्व वेदांचे सार असलेला, त्रिवर्ग साधना करणारा अनंतकोटी ब्रह्मांडनायक.

त्यानंतर शक्तीमंत्रांनी देवतेच्या रुद्ररूपाला आवाहन करून सर्व भयापासून सोडवण्यासाठी स्वतःभोवती शिवकवचाचे रक्षाकवच लाभावे म्हणून देवतेची विनवणी आहे.

शिवकवचेन माम्

आच्छादय आच्छादय

मृत्युंजय त्र्यंबक सदाशिव नमस्ते नमस्ते।।

अखेर शेवटी फलश्रुतीच्या मंत्राने श्रीशिवकवच स्तोत्राची समाप्ती केली आहे. शिवदेवता ही अनादि अनंत आहे. शिवशक्ती महान आहे. शिवमहिमा अमर्याद आहे हे या शिवकवचाचे सार आहे. श्रीशिवकवचाच्या पठणाने आपले सर्व दुष्ट, वाईट गोष्टींपासून रक्षण होईल अशी शिवभक्तांची श्रद्धा आहे. त्याहीपेक्षा जास्त म्हणजे या स्तोत्रपठणाने आपले मनोबल वाढेल व आपण प्रतिकूल परिस्थितीशी सामना करू शकणार आहोत अशी मानसिकता निश्चितच प्राप्त होईल.