पायलट निनाद मांडवगणे यांच्यावर आज अंत्यसंस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नाशिक 

जम्मू-कश्मीरमधील बडगाममध्ये बुधवारी हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात शहीद झालेले नाशिकचे स्क्वॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे यांच्यावर शुक्रवारी नाशिक येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

श्रीनगर विमानतळावरून बुधवारी सकाळी दहा वाजता उड्डाण घेतलेले एमआय-17 व्ही 5 बनावटीचे हवाई दलाचे हेलिकॉप्टर दहा मिनिटांतच कोसळले. या अपघातात पायलटसह सहाजण शहीद झाले, त्यात नाशिकच्या उपनगरजवळील डीजीपीनगर येथील श्री साईस्वप्न को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीमधील बँक ऑफ इंडिया कॉलनीत राहणारे स्क्वॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे (33) हे शहीद झाले. त्यांच्या पश्चात असलेले वडील अनिल, आई सुषमा, पत्नी विजेता, दोन वर्षांची मुलगी हे आज दुपारी लखनौ येथून नाशिक येथे आले. जर्मनीतील त्यांचा धाकटा भाऊ आज नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे.

शहीद निनाद मांडवगणे यांचे पार्थिव गुरुवारी रात्री ओझर विमानतळावर येणार आहे. सकाळी हे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. यानंतर नाशिकमधील अमरधाम येथे लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

सार्थ अभिमान

देशसेवा करताना निनाद मांडवगणे शहीद झाले याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे निनाद यांचे वडील अनिल, आई सुषमा आणि पत्नी विजेता यांनी सांगितले.