
सामना प्रतिनिधी, मुंबई
मराठय़ांना ओबीसीअंतर्गत आरक्षण दिले तर त्यांना आपोआपच सर्वच क्षेत्रांत आरक्षण द्यावे लागेल. परंतु मराठा समाजाला केवळ शासकीय नोकऱया आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाअंतर्गत प्रवेश मिळावा हे शासनाचे उद्दिष्ट असल्यानेच एससीबीसी हा वेगळा प्रवर्ग तयार करावा लागला व त्याअंतर्गत सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावे लागले असा युक्तिवाद आज राज्य शासनातर्फे मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला.
मराठा आरक्षणाविरोधात हायकोर्टात विविध याचिका दाखल करण्यात आल्या असून या याचिकांवर न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. मराठय़ांना आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने सामाजिक आणि शैक्षणिक मागास हा वेगळा प्रवर्ग का तयार केला, ओबीसीअंतर्गत मराठय़ांना आरक्षण का नाही देण्यात आले असा सवाल सरकारला विचारला.
त्यावेळी सरकारी वकील ऍड. व्ही. ए. थोरात यांनी कोर्टाला सांगितले की, मराठय़ांना केवळ ओबीसीअंतर्गत आरक्षण दिले तर राजकारणासह सर्वच क्षेत्रांत आपोआप आरक्षण द्यावे लागेल आणि सरकारला ते नको आहे. परंतु सरकारी नोकरी व शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाअंतर्गत प्रवेश मिळावा हे शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळेच त्यांना वेगळा प्रवर्ग तयार करून आरक्षण देण्यात आले असे थोरात यांनी सांगितले. याशिवाय घटनेतील परिच्छेद 15(4) आणि 16(4) नुसार सरकारला समाजातील मागास प्रवर्गाचा शोध घेऊन आरक्षण देण्याचा अधिकार असल्याचेही त्यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले.


























































